गोमांस पुरवणाऱ्याच्या शोधात पोलीस

By Admin | Updated: June 7, 2015 00:24 IST2015-06-07T00:24:05+5:302015-06-07T00:24:05+5:30

खैरणे येथे गोमांस विक्री करणाऱ्यांवर कोपरखैरणे पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी चौघांची न्यायालयीन कोठडी पूर्ण झाली असून, त्यांना मांस पुरवणाऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत.

Police in search of beef suppliers | गोमांस पुरवणाऱ्याच्या शोधात पोलीस

गोमांस पुरवणाऱ्याच्या शोधात पोलीस

नवी मुंबई : खैरणे येथे गोमांस विक्री करणाऱ्यांवर कोपरखैरणे पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी चौघांची न्यायालयीन कोठडी पूर्ण झाली असून, त्यांना मांस पुरवणाऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत. त्याच्याकडून इतरही अनेक बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
गोमांस विक्री होत असल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी खैरणे गाव येथे एका बांधकाम अपूर्ण असलेल्या इमारतीमध्ये छापा टाकला. या वेळी त्या ठिकाणी होणारी गोमांस विक्री उघड झाली. या प्रकरणी पोलिसांनी इरफान पटेल, रिझवान पटेल, मोहम्मद शेख व फरिज कडके यांना अटक केली होती. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गोमांसदेखील जप्त केले होते. इरफान व रिझवान हे दोघे भाऊ मटण विक्रीच्या परवान्याखाली गाई व बैलाच्या मांसाची विक्री करायचे. परंतु दोन वर्षांपूर्वीच मटण विक्रीचा परवाना संपलेला असतानाही त्याचा हा व्यवसाय सुरूच होता. इरफान हा तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांचा वाहनचालक होता. मात्र काही महिन्यांपूर्वी त्याने नोकरी सोडलेली आहे. गोमांस विक्री प्रकरणी चौघांनाही कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानुसार न्यायालयीन कोठडीची शिक्षाही त्यांची पूर्ण झाली आहे. यापुढील तपासासाठी त्यांना गोमांस पुरवणाऱ्या दोघांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. त्यांना अटक झाल्यास कल्याण व इतर ठिकाणी गोमांस विक्री होणाऱ्या ठिकाणांचीही माहिती कळू शकेल, असेही ते म्हणाले. अज्ञात ठिकाणी गाई व बैलांची हत्या करून त्यांचे मटण संबंधित ठिकाणी पुरवठा केले जायचे. त्यानुसार फरार असलेल्या दोघांचाही शोध सुरू असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Police in search of beef suppliers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.