‘त्या’ तोतया पोलिसांना सोलापूरमधून अटक; गुन्हे शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:58 IST2018-11-03T00:57:53+5:302018-11-03T00:58:02+5:30
महिला व्यवसायिकाला पोलीस असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने सोलापूरमधून अटक केली आहे.

‘त्या’ तोतया पोलिसांना सोलापूरमधून अटक; गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई : महिला व्यवसायिकाला पोलीस असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने सोलापूरमधून अटक केली आहे. यामध्ये एका फादरचा समावेश आहे. त्यांच्या अटकेनंतर या गुन्ह्यातील आरोपींची संख्या पाचवर पोहोचली.
विकास माणिकराव एडके (५४) आणि गब्रिअल उर्फ रॉबी फ्रान्सिस स्वामी (४४) अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे दोघे सोलापूर परिसरात असल्याची माहिती कक्ष ११ चे सपोनि. शरद झिने यांना मिळाली. त्यानुसार प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथक सोलापूरला रवाना झाले. त्यांनी रात्री उशिराने दोघांना ताब्यात घेतले. यात स्वामी हा फादर असून एडके हा पेंटिंगचे काम करतो. या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे अद्याप तरी उघड झालेले नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र फसवणूक करून मिळवलेल्या रकमेतील काही टक्के मुख्य आरोपी त्यांना द्यायचा, असे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.
वीणा शहा (नावात बदल) या महिला व्यवसायिकाने ३० आॅक्टोबर रोजी दिंडोशी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. थॉमस वसंत नावगिरे (५६), शैलेश पोळ (३३) आणि दिलीप पोळ (६०) या तिघांनी शाह यांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज मिळण्यासाठी १२ लाख रुपयांची मागणी केली. हे पैसे घेऊन त्या मिरजला गेल्या. तेव्हा त्यांना एक बॅग देत यात १० कोटी रुपये आहेत, असे सांगण्यात आले. तसेच विविध देशांचे चलन हुबेहूब छापणाºया राजू नामक इसमासोबत त्यांची ओळख करून देण्यात आली. त्या वेळी त्या ठिकाणी दोन व्यक्ती आल्या आणि पोलीस असल्याची बतावणी केली. त्यांनी राजूला दोन कानशिलात लगावत १२ लाख रुपये आणि कथित १० कोटी रुपयांची बॅग सोबत घेऊन निघून गेले. त्याच दोन तोतया पोलिसांच्या मुसक्या शरद झिने यांच्या पथकाने आवळल्या आहेत. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे तपास अधिकाºयांकडून सांगण्यात आले.