जकात चुकवणारा तोतया पोलीस गजाआड
By Admin | Updated: November 17, 2015 03:13 IST2015-11-17T03:13:48+5:302015-11-17T03:13:48+5:30
तोतया पोलीस बनून जकात चुकविणाऱ्या ठगाला नवघर पोलिसांनी सोमवारी अटक केली. सुदर्शन सुरेश केळसीकर (३०) असे आरोपीचे नाव असून, तो एजंट म्हणून काम करतो.

जकात चुकवणारा तोतया पोलीस गजाआड
मुंबई : तोतया पोलीस बनून जकात चुकविणाऱ्या ठगाला नवघर पोलिसांनी सोमवारी अटक केली. सुदर्शन सुरेश केळसीकर (३०) असे आरोपीचे नाव असून, तो एजंट म्हणून काम करतो.
नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई गणपत बोडके यांनी ठाणे येथे फ्लॅटचे बुकिंग केले होते. या फ्लॅटवर लोन मिळवून घेण्यासाठी त्यांनी केळसीकरकडे कागदपत्रे दिली होती. पोलीस ओळखपत्रासह महत्त्वाच्या कागदपत्रांचा यात समावेश होता. याचा फायदा घेत केळसीकरने बोडकेंच्या पोलीस ओळखपत्रावर स्वत:चा फोटो चिकटवून जकात चुकविण्यासाठी तो ओळखपत्राचा वापर करू लागला.
ठाणे येथील रहिवाशी असलेला केळसीकर पोलीस असल्याचे सांगून जकात देण्यास टाळाटाळ करत होता. सोमवारी आनंद नगर जकात नाक्यावर जकात न भरता तो पुढे निघाला. तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला हटकले, तेव्हा पोलीस असल्याची बतावणी करून त्याने जवळील ओळखपत्र दाखवले. मात्र, तेथील पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने केळसीकरला नवघर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. केळसीकरच्या चौकशीत वरील प्रकार समोर आला. त्याने अनेकांना गंडा घातल्याची शक्यता आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याची माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मोटेपाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)