Join us

पोलीस भरतीमध्ये छातीवर जात लिहिल्याचा निषेध!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 05:52 IST

मध्य प्रदेशमधील धार जिल्हा रुग्णालयात पोलीस भरतीदरम्यान सुरू असलेल्या वैद्यकीय तपासणीत उमेदवारांच्या छातीवर जात लिहिण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाने सोमवारी दादर रेल्वे स्थानकाबाहेर मध्य प्रदेश सरकारविरोधात निदर्शने केली.

मुंबई : मध्य प्रदेशमधील धार जिल्हा रुग्णालयात पोलीस भरतीदरम्यान सुरू असलेल्या वैद्यकीय तपासणीत उमेदवारांच्या छातीवर जात लिहिण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाने सोमवारी दादर रेल्वे स्थानकाबाहेर मध्य प्रदेश सरकारविरोधात निदर्शने केली. मध्य प्रदेश सरकारविरोधात अ‍ॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रमुख मागणी या वेळी अध्यक्ष कचरू यादव यांनी केली.यादव म्हणाले की, मध्य प्रदेश सरकार जातीयवादी असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या छातीवर त्यांची जात लिहिणे अत्यंत निंदनीय आहे. परिणामी, सरकारसह मुख्यमंत्र्यांविरोधात अ‍ॅट्रोसिटी गुन्हा दाखल करायला हवा, तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयासह राज्यपालांना देणार असल्याचेही यादव यांनी सांगितले.या वेळी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. गायकवाड म्हणाले की, मध्य प्रदेशमधील सरकार हे केंद्राच्याच पावलावर पाऊल टाकत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी वारंवार आपण खालच्या जातीतील असल्याचा उल्लेख करतात. मात्र, हा त्यांचा दिखाऊपणा आहे. मुळात पंतप्रधान अनुसूचित जाती किंवा जमातीमधील नाहीत. त्यामुळे मतांसाठी एक बोलायचे आणि प्रत्यक्षात आतून वेगळेच वागायचे, असा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे. आगामी निवडणुकीत त्यांचा हा बुरखा मतदार फाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत, असा इशाराही गायकवाड यांनी या वेळी दिला.

टॅग्स :काँग्रेसमुंबई