पोलिसांनी मुंबई राखली, अनुचित प्रकार नाही
By Admin | Updated: July 31, 2015 04:08 IST2015-07-31T04:08:37+5:302015-07-31T04:08:37+5:30
अभेद्य व्यूहरचना आणि तिची अचूक अंमलबजावणी या जोरावर मुंबई पोलिसांनी गुरुवारी शहरात एकही अनुचित प्रकार घडू दिला नाही. हजारोंची गर्दी उसळूनही अत्यंत मोकळ्या वातावरणात बॉम्बस्फोट

पोलिसांनी मुंबई राखली, अनुचित प्रकार नाही
- जयेश शिरसाट, मुंबई
अभेद्य व्यूहरचना आणि तिची अचूक अंमलबजावणी या जोरावर मुंबई पोलिसांनी गुरुवारी शहरात एकही अनुचित प्रकार घडू दिला नाही. हजारोंची गर्दी उसळूनही अत्यंत मोकळ्या वातावरणात बॉम्बस्फोट मालिकेतील सिद्धदोष गुन्हेगार याकूब मेमनचा दफनविधी पार पडला. त्यामुळे जातीय दंगलीचे चटके अनुभवलेल्या लाखो मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
गुरुवारी पहाटे नागपूर कारागृहात फाशी दिल्यानंतर याकूबचा मृतदेह माहीम, वीर सावरकर मार्गावरील बिस्मिल्ला मंझिल इमारतीत आणण्यात येणार होता. तेथून मरिन लाइन्स स्थानकासमोरील बडा कब्रस्तान येथे याकूबच्या मृतदेहावर दफनविधी पार पडणार होता. पोलीस आयुक्त राकेश मारिया रात्रभर पोलीस नियंत्रण कक्षात तळ ठोकून होते. त्यांच्यासोबत सहआयुक्त देवेन भारती, अतुलचंद्र कुलकर्णी, पाच अप्पर आयुक्त आणि १२ उपायुक्तांनीही रात्र जागवली.
शहरातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले सहआयुक्त देवेन भारती संपूर्ण शहरात सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईचा आढावा घेत होते, सूचना व आदेश देत होते. पहाटे साडेचारच्या सुमारास भारती यांनी माहीम पोलीस ठाणे गाठले. तर याकूबला फाशी दिल्यानंतर आयुक्त मारिया सकाळी माहीमला धडकले. दिवसभर मारिया माहीम व बडा कब्रस्तान या मोक्याच्या ठिकाणी जातीने हजर राहिल्याने सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांचे मनोबल उंचावले होते. परिसरातील जाणकार, धर्मगुरूंच्या बैठका घेऊन शांततेचे व सहकार्याचे आवाहन केले होते. यासोबतच आयुक्त मारियांपासून सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैयक्तिक पातळीवर अनेकांशी चर्चा करून शांतता राखण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते.
आजचा दिवसही महत्त्वाचा
याकूब मेमनच्या फाशीच्या दिवशी मुंबईसह राज्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यात पोलीस यंत्रणा यशस्वी ठरली आहे. मात्र पोलिसांसाठी उद्या, शुक्रवारही महत्त्वाचा दिवस आहे. शुक्रवारी जुम्माच्या नमाजासाठी मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने मशीद, दर्गा येथे जमतात. या पार्श्वभूमीवर महासंचालक संजीव दयाळ यांनी राज्यात उद्याही कडेकोट बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आयुक्त राकेश मारिया यांनी गुरुवारचा बंदोबस्त कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पोलिसांची शुक्रवारची साप्ताहिक सुटी रद्द केली आहे.
750 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
याकूबच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली होती. काल रात्रीपर्यंत सुमारे ४५० हून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली होती. सराईत गुन्हेगार, धर्मभावना भडकाणारे, प्रक्षोभक भाषणे करणारे किंवा याआधी अशा गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतलेल्यांवर ही कारवाई करण्यात आली. पहाटे याकूबच्या फाशीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर दुपारपर्यंत पोलिसांनी आणखी ३०० जणांवर कारवाई केली.
800पोलिसांचा वेढा बिस्मिल्ला मंझिलला
पहाटे ६ वाजल्यापासून माहीमच्या वीर सावरकर मार्गावरील बिस्मिल्ला मंझिल आणि आसपासचा परिसर पोलिसांनी ताब्यात घेतला. माहीम पोलिसांसह शीघ्र कृती दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या सशस्त्र तुकड्या आणि हत्यारी विभागातील अतिरिक्त मनुष्यबळ तैनात होते. आयुक्त राकेश मारिया, परिमंडळ पाचचे उपायुक्त डॉ. महेश पाटील आणि पथक आघाडीवर राहून गर्दीचे नियोजन करताना दिसत होते. त्यामुळे या भागाला छावणीचे स्वरूप आले होते.
पोलिसांसोबत माहीमच्या स्थानिकांनी मोलाचे सहकार्य केले. येथील दर्गा कमिटी, थोरा-मोठ्यांच्या मदतीने आजचा दिवस शांततेत पार पडला.
- डॉ. महेश पाटील,
माहीमचे उपायुक्त