पोलीस जीप चोरीचे खापर निरीक्षकावर फोडणे रद्द
By Admin | Updated: January 7, 2015 02:04 IST2015-01-07T02:04:56+5:302015-01-07T02:04:56+5:30
नाथा कांबळे यांच्याकडून वसूल करण्याची सरकारची कारवाई महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) बेकायदा ठरवून रद्द केली आहे.

पोलीस जीप चोरीचे खापर निरीक्षकावर फोडणे रद्द
मुंबई : मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्याच्या आवारात उभी केलेली बोलेरो जीप आठ वर्षांपूर्वी चोरीला गेल्याचे खापर फोडून त्या जीपच्या किंमतीपोटी ३.५७ लाख रुपये पोलीस निरीक्षक संजीवन नाथा कांबळे यांच्याकडून वसूल करण्याची सरकारची कारवाई महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) बेकायदा ठरवून रद्द केली आहे.
विशेष म्हणजे १७ एप्रिल २००६ रोजी चोरीला गेलेली ही जीप अद्याप सापडलेली नाही. त्यावेळी काळाचौकीत असलेले कांबळे आता माहिम येथे सागरी पोलीस ठाण्यात नियुक्तीवर आहेत. जीप रात्रीच्या वेळी निष्काळजीपणाने उभी केल्याने ती चोरीला गेली असा ठपका ठेवून जीपची किंमत वसूल करण्याखेरीज एक वार्षिक वेतनवाढ स्थगित करण्याची शिक्षा पोलीस आयुक्तांनी कांबळे यांना दिली होती. अपिलात राज्य सरकारनेही ती कायम केली होती. याविरुद्ध केलेली याचिका मंजूर करून ‘मॅट’चे प्रशासकीय सदस्य एम. रमेश कुमार यांनी हा निकाल दिला.
काळाचौकी पोलीस ठाण्याला लागूनच पोलीस अधिकाऱ्यांच्या क्वार्टर्स आहेत व त्या दोन्हींभोवती कुंपणभिंत घातलेले मोकळे आवार आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात सरकारी जीप रात्रीच्या वेळी उभी करणे हा निष्काळजीपणा कसा ठरतो, हे अनाकलनीय आहे. शिवाय चोरीला गेलेली जीप अद्याप सापडलेली नाही. त्यामुळे मुळात पोलीस ठाण्याच्या आवारातून पोलिसांचीच जीप चोरीला जाण्याच्या नामुष्कीचे खापर विनाकारण कांबळे यांच्या माथी फोडण्याचा हा प्रकार आहे, असेही न्यायाधिकरणाने नमूद केले.
न्यायाधिकरण म्हणते की, खरे तर इतर कोणत्याही वाहनाप्रमाणे या जीपचाही विमा उतरविलेला असता तर कांबळे यांच्याकडून किंमत वसूल करण्याची वेळच आली नसती. पण सरकारी वाहनांना विम्याची सक्ती नाही, अशी भूमिका घेणाऱ्या पोलीस आयुक्तांनी या घटनेनंतर सर्वच वाहनांचा विमा उतरविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा ही पश्चातबुद्धी आहे. ‘मॅट’ने असेही म्हटले की, त्या काळात मुंबईत पोलिसांची तब्बल ६४ वाहने चोरीला गेली होती. काळाचौकीच्या या घटनेनंतर या वाहनचोरींचा शोध घेण्यासाठी कांबळे यांच्याच नेतृत्वाखाली विशेष पथक नेमले गेले. परंतु त्यांनी मिळविलेल्या सुगाव्याचा पाठपुरावा करण्याऐवजी ही शोधमोहीमच गुंडाळण्यात आली. यावरून प्रशासनाला वाहन चोरींचा छडा लावण्यापेक्षा कोणाला तरी ‘बळीचा बकरा’ करण्यातच अधिक स्वारस्य असावे, या कांबळे यांच्या म्हणण्यात तथ्य वाटते. या सुनावणीत कांबळे यांच्यासाठी अॅड. भूषण व गौरव बांदिवडेकर यांनी तर सरकार व पोलीस आयुक्तांसाठी सरकारी वकील श्रीमती के. एस. गायकवाड यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)
वरिष्ठांच्याच आज्ञेचे पालन
कांबळे पोलीस ठाण्याला लागून असलेल्या क्वार्टर्समध्येच राहायचे. पोलीस चालक उपलब्ध नसल्याने आणि कांबळे यांच्याकडे वाहनचालक परवाना असल्याने त्यांनी कामासाठी स्वत:च जीप चालवावी, असे आपणच त्यांना सांगितले होते. तसेच ज्या रात्री जीप चोरीला गेली त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पुन्हा तपासाच्या कामावर जायचे असल्याने घरी थोडा वेळ विश्रांती घ्यायला जाताना कांबळे यांनी चीप आवारात उभी करणे हा निष्काळजीपणा आहे, असे आपल्याला वाटत नाही, अशी साक्ष त्यांचे त्यावेळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण चव्हाण यांनी खातेनिहाय चौकशीत दिली होती.