Join us  

निवडणूक बंदोबस्तावरील पोलिसांचे स्वास्थ्य हरवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 6:47 AM

उन्हामुळे जिवाची काहिली होत असताना, राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी २४ तास बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांवर कामाचा ताण असून, वेळेवर जेवण व पुरेशी झोप नसल्याने त्यांचे स्वास्थ्य बिघडले आहे.

मुंबई/कोल्हापूर : उन्हामुळे जिवाची काहिली होत असताना, राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी २४ तास बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांवर कामाचा ताण असून, वेळेवर जेवण व पुरेशी झोप नसल्याने त्यांचे स्वास्थ्य बिघडले आहे. राज्यातील सव्वा लाख पोलिसांबरोबरच होमगार्ड, एसआरपी व सीआरपीएफच्या जवानांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.युती आणि आघाडीतील ‘व्हीआयपी’ नेत्यांना सर्वच मतदारसंघांतून सभा व रॅलीसाठी मागणी असल्याने त्यांचे वाढते दौरे व सभांतील बंदोबस्ताचे नियोजन करताना पोलिसांची दमछाक होत आहे. अनेक ठिकाणी पोलिसांना अल्पोपाहार, पिण्याच्या पाण्याचीही सोय उपलब्ध नसल्याने त्यांचे हाल होत आहेत.मंत्री, केंद्रीय मंत्री व व्हीआयपी नेत्यांच्या दौऱ्यावेळी सुरक्षेसाठी पोलिसांना घटनास्थळी किमान तीन तास आधी बंदोबस्ताला तैनात केले जाते. सभा संपून नेत्यांचे प्रस्थान होईपर्यंत त्या ठिकाणाहून न हलण्याचे आदेश असल्याने पोलिसांना उन्हात तासन्तास उभे राहावे लागते. काही ठिकाणी पाण्याचीही सोय नसते.कोल्हापूरमध्ये नागपूर, बीड, लातूर, पुणे रेल्वे, वर्धा, ट्रेनिंग कॅम्प येथून १,५०० पोलीस कोल्हापुरात बंदोबस्तासाठी दाखल झाले आहेत. जिल्ह्यासह परजिल्ह्यातील ५,५४४ पोलीस २४ तास पहारा देत आहेत. प्रत्येक कॅम्पमध्ये १०० ते १५० पोलिसांचा समावेश आहे.>निवडणुका सुरळीतव निर्भय वातावरणात पार पडणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने सर्व उपाययोजना राबविल्या जात आहेत. बंदोबस्ताच्या ठिकाणी आवश्यक प्राथमिक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. मतदान केंद्राच्या बंदोबस्ताच्या ठिकाणची सुविधा पुरविण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असून त्याबाबत सूचना केल्या आहेत.- सुबोध जायसवाल,पोलीस महासंचालक

टॅग्स :पोलिस