गवळी कुटुंबीयांच्या मदतीसाठी पोलीस सरसावले
By Admin | Updated: September 25, 2014 23:30 IST2014-09-25T22:31:38+5:302014-09-25T23:30:04+5:30
परजिल्ह्यातूनही मदत : जिल्ह्यातील प्रत्येक पोलिसाचा एक दिवसाचा पगार देणारे

गवळी कुटुंबीयांच्या मदतीसाठी पोलीस सरसावले
कऱ्हाड : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस नाईक संतोष गवळी यांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचे अनेक हात सरसावले आहेत़ प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याचा एक दिवसाचा पगार गवळी कुटुंबीयांना मदत म्हणून देण्याचा निर्णय जिल्हा पोलीस दलाने घेतला आहे़ तसेच साताऱ्यासह इतर जिल्ह्यातील पोलिसांकडूनही मदत देण्यात आली आहे़
पाटण तिकाटणे येथे बुधवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी ट्रकच्या धडकेत पोलीस नाईक संतोष गवळी यांचा मृत्यू झाला होता़ संतोष गवळी यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे़ त्यामुळे मुलांच्या भविष्याचा विचार करून पोलीस दलाने या कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला़
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व उपअधीक्षक मितेश घट्टे यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याचा एक दिवसाचा पगार गवळी कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ करमाळा उपविभागाच्या वतीनेही ३५ हजारांची आर्थिक मदत देण्यात आली आहे़ सामाजिक कार्यकर्ते डॉ़ अविनाश पोळ यांनी गवळी यांच्या तिन्ही मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे़ तसेच उपअधीक्षक मितेश घट्टे यांच्या महाविद्यालयीन ग्रुपने प्रत्येकी एक दिवसाचा पगार व मुलींचा सर्व शैक्षणिक खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे़ (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी सकाळी गवळी कुटुंबीयांशी फोनवर संपर्क साधला़ त्यावेळी त्यांनी गवळी कुटुंबीयांचे सांत्वन करण्याबरोबरच त्यांना मदत देण्याचेही आश्वासन दिले़