विसर्जनासाठी पोलीस सज्ज
By Admin | Updated: September 7, 2014 23:55 IST2014-09-07T23:55:03+5:302014-09-07T23:55:03+5:30
अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्ह्यात होणाऱ्या गणेश विसर्जनाकरिता रायगड पोलीस सज्ज झाले आहेत.

विसर्जनासाठी पोलीस सज्ज
अलिबाग : अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्ह्यात होणाऱ्या गणेश विसर्जनाकरिता रायगड पोलीस सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात एकूण १४२ सार्वजनिक तर १७ हजार ८०९ घरगुती गणपतींना गणेशभक्त निरोप देणार आहेत. जिल्ह्यातील किनारपट्टीतील गावांतील गणपतींचे विसर्जन सर्वसाधारणपणे समुद्रातच करण्यात येते. परिणामी किनारी भागात बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक सार्वजनिक गणपती खोपोली येथे १७ आहेत तर पेण व कर्जतमध्ये प्रत्येकी १२, माणगावमध्ये १४ तर महाड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ सार्वजनिक गणपती आहेत.
गणपती विसर्जनाकरिता रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी विशेष बंदोबस्त नियोजित केला आहे. या मध्ये ७ उपविभागीय पोलीस अधिकारी, २२ पोलीस निरीक्षक, १९ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ५३ पोलीस उपनिरीक्षक, नाशिक येथून आलेले १० पोलीस उपनिरीक्षक, १९ प्रशिक्षणार्थी पोलीस निरीक्षक,४२६ पोलीस जवान यांचा समावेश आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकांच्या निमित्ताने जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन प्लाटून्स, सहा स्ट्रायकिंग फोर्स युनिट्स, एक शीघ्र कृती दल आणि दोन दंगा प्रतिबंधक पथके जिल्ह्यात तैनात केली आहेत. दरम्यान, पोलीस दलास बंदोबस्तात सहकार्य करण्याकरिता गृहरक्षक दलाचे ४०० जवान देखील जिल्ह्यात तैनात केले आहेत.
इको फ्रेंडली गणेशोत्सव व सागरी पर्यावरण ऱ्हास थांबविण्यास गतवर्षी पासून अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने गणेश विसर्जनाकरिता कृत्रिम तलाव गणेशभक्तांना उपलब्ध करुन दिला आहे. (विशेष प्रतिनिधी)