पोलीसच पोलिसांना मदत करत नाहीत
By Admin | Updated: June 5, 2015 01:35 IST2015-06-05T01:35:42+5:302015-06-05T01:35:42+5:30
जुन्याच मुद्द्यांचा आधार घेत या अधिकाऱ्यांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी गुरुवारी विशेष न्यायालयात केली.

पोलीसच पोलिसांना मदत करत नाहीत
मुंबई : ड्रग माफिया शशिकाला ऊर्फ बेबी रमेश पाटणकर हिला अटक टाळण्यासाठी मदत करणे व तिला व्यवसायासाठी सहकार्य करणे या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले पाच पोलीस अधिकारी तपासात मदत करीत नसल्याचा दावा करत गुन्हे शाखेने जुन्याच मुद्द्यांचा आधार घेत या अधिकाऱ्यांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी गुरुवारी विशेष न्यायालयात केली. ती मान्य करत विशेष न्यायाधीश यू.बी. हजीब यांनी या अधिकाऱ्यांच्या पोलीस कोठडीत ८ जूनपर्यंत वाढ केली.
पोलीस निरीक्षक सुहास गोखले, पोलीस निरीक्षक गौतम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर सारंग, सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्योतीराम माने व पोलीस हवालदार यशवंत पार्टे यांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यांना महानगर दंडाधिकारी न्यायालयाने ४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत संपल्याने या अधिकाऱ्यांना गुरुवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. (प्रतिनिधी)