तोतया पोलिसांनी रेशनची गाडी पळवली
By Admin | Updated: June 22, 2015 02:12 IST2015-06-22T02:12:11+5:302015-06-22T02:12:11+5:30
पोलीस असल्याचे भासवून रेशनचा टेम्पो पळवल्याची घटना रविवारी घाटकोपर येथे घडली. अनिल गुप्ता यांचे

तोतया पोलिसांनी रेशनची गाडी पळवली
मुंबई : पोलीस असल्याचे भासवून रेशनचा टेम्पो पळवल्याची घटना रविवारी घाटकोपर येथे घडली.
अनिल गुप्ता यांचे मानखुर्द परिसरात रेशनचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रेशनचा माल घेऊन एक टेम्पो त्यांच्या मानखुर्दमधील दुकानावर जात होता. टेम्पो घाटकोपरच्या छेडानगर येथे पोहोचताच दोन इसमांनी टेम्पो अडवला. टेम्पोचालकाला पोलीस असल्याचे भासवत टेम्पो पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचे सांगितले. त्यानुसार दोघेही टेम्पोमध्ये बसले. मात्र गाडी टिळकनगर पोलीस ठाण्यात नेण्याऐवजी हा टेम्पो दोघांनी मुलुंड चेकनाका येथे नेला. या वेळी नवघर पोलीस या ठिकाणी दाखल झाले. टेम्पोमध्ये असलेला रेशनचा माल चोरीचा असल्याचे सांगत या इसमांनी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नवघर पोलिसांकडे केली. मात्र चालकाकडे मालाचे सर्व बिल असल्याचे पाहून पोलिसांनी टेम्पोला सोडून दिले.
मात्र पोलीस असल्याची बतावणी करून टेम्पोसह चालक आणि क्लीनरचे अपहरण करणाऱ्या दोन्ही इसमांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गुप्ता यांनी केली. ज्या हद्दीत ही घटना घडली, ती टिळकनगरची असल्याचे सांगत नवघर पोलिसांनी त्यांना टिळकनगर येथे पाठविले. त्यानंतर गुप्ता टिळकनगर पोलीस ठाण्यात आल्यानंतर टिळकनगर पोलिसांनी त्यांना पुन्हा नवघर पोलीस ठाण्यात पाठवले. मात्र दोन्हीपैकी कोणत्याही पोलीस ठाण्यात अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. (प्रतिनिधी)