Join us  

पोलीस ३० तासांहून अधिक काळ बंदोबस्तासाठी तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 3:11 AM

रखरखत्या उन्हातही चोख बंदोबस्त : किरकोळ वादाच्या घटना वगळता मुंबईत मतदान निर्विघ्न पार

मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबईत सोमवारी सहाही लोकसभा मतदारसंघांत एकही अनुचित घटना न घडता निर्विघ्नपणे मतदान पार पडले. त्यासाठी खाकी वर्दीवाले सलग ३० तासांहून अधिक काळ बंदोबस्तासाठी तैनात होते. रखरखते ऊन आणि घामाच्या धारा वाहत असताना मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी घडणाऱ्या प्रत्येक घटना-घडामोडीवर ते बारकाईने लक्ष ठेवून होते.

रविवारी सायंकाळपासून शहर व उपनगरातील मतदान केंद्रांवर सुरक्षेसाठी पोलिसांना तैनात करण्यात आले होते. सोमवारी रात्री मतदान केंद्रांवरून सील केलेले व्होटिंग मशीन्स रवाना झाल्यानंतर रात्री उशिरा बंदोबस्त मागे घेण्यात आला. मुंबई पोलिसांसह केंद्रीय राखीव दलाच्या १४ व राज्य राखीव दलाच्या १२ कंपन्या आणि होमगार्डसह एकूण ४० हजारांहून अधिक जण बंदोबस्तासाठी तैनात होते. पोलीस आयुक्त संजय बर्वे स्वत: निवडणूक बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते. काही ठिकाणी घडलेल्या किरकोळ वादाच्या घटना वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याने पोलिसांनी समाधानाचा सुस्कारा सोडला.

लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यात मुंबईच्या सहाही मतदारसंघांचा समावेश होता. देशातील आर्थिक राजधानी असलेल्या महानगरातील निवडणुकीवर सर्वांचे लक्ष लागून असल्याने सुरक्षा यंत्रणेत कसल्याही त्रुटी न ठेवण्याचे आदेश आयुक्त संजय बर्वे यांनी दिले होते. पोलीस व केंद्रीय व राज्य राखीव दलाच्या पोलिसांव्यतिरिक्त ६ हजार होमगार्ड तैनात करण्यात आले होते. निवडणूक आयोगाकडून त्यांना एक वेळेचे जेवण व दोनवेळा अल्पोपहार देण्यात आला. या सर्वांनी चोख काम बजावल्याने कुठलाही अुनचित प्रकार घडला नाही, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रांवर मतदानासाठी आलेल्या मतदारांनी दिली.

संवेदनशील केंद्रांवर बारकाईने नजरमतदानावेळी सुरक्षा यंत्रणेत कसल्याही त्रुटी न ठेवण्याचे आदेश पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी दिले होते. त्यानुसार सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विनय चौबे यांनी मुंबईतील सहा मतदारसंघांतील १,४९२ मतदान केंद्रांच्या १०,०७३ बुथवर बंदोबस्ताचे नियोजन केले होते. विविध मतदारसंघांतील संवेदनशील ३३५ केंद्रांवर अधिक बंदोबस्त तैनात करून तेथे बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते.

टॅग्स :लोकसभा निवडणूकपोलिस