पोलिसांचा मृत्युआलेख वाढतोय
By Admin | Updated: May 12, 2015 04:37 IST2015-05-12T04:37:53+5:302015-05-12T04:37:53+5:30
वाकोला पोलीस ठाण्यात तणावातून एका पोलीस अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या करून स्वत: आत्महत्या करण्याच्या घटनेने

पोलिसांचा मृत्युआलेख वाढतोय
मुंबई : वाकोला पोलीस ठाण्यात तणावातून एका पोलीस अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या करून स्वत: आत्महत्या करण्याच्या घटनेने पोलिसांवरील ताणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच तणावातून पोलिसांच्या हृदयाचे ठोके वाढत असून गेल्या दीड वर्षात हृदयविकाराच्या झटक्याने ५१ पोलिसांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे.
पोलिसांवर दिवसेंदिवस कामाचा वाढता ताण आणि बोजा हे यामागील मुख्य कारण असल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. वाकोला पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिर्के यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी यांच्यावर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना २ मे रोजी घडली. या घटनेमुळे पोलिसांवरील ताणतणावाचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. पोलीस आणि ताण हे समीकरणच बनलेले आहे. वाढत्या ताणामुळे पोलीस वैफल्यग्रस्त, चिडचिडे बनू लागले आहेत. परिणामी पोलीस विविध आजारांनी ग्रस्त होत आहेत. ताणाचा अतिरेक झाला, की मग आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले जाते.
मुंबई पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०१४ मध्ये एकूण १४९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाला होता. तर २०१५ मध्ये आतापर्यंत ४६ पोलिसांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दिलीप शिर्के यांच्यावर ताण होता आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. गेल्या दीड वर्षाच्या या आकडेवारीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच ५१ आहे. त्यापाठोपाठ १७ पोलिसांचा कर्करोगाने, तर ११ पोलिसांचा क्षयरोगाने, अपघाताने १९ आणि ३५ पोलिसांचा आकस्मिक मृत्यू झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)