धर्मराज काळोखेला पोलीस कोठडी
By Admin | Updated: March 25, 2015 02:29 IST2015-03-25T02:29:04+5:302015-03-25T02:29:04+5:30
एमडी तस्करी प्रकरणी सातारा पोलिसांनी अटक केलेल्या पोलीस शिपाई धर्मराज काळोखेचा ताबा मरिनड्राइव्ह पोलिसांनी घेतला आहे.

धर्मराज काळोखेला पोलीस कोठडी
मुंबई : एमडी तस्करी प्रकरणी सातारा पोलिसांनी अटक केलेल्या पोलीस शिपाई धर्मराज काळोखेचा ताबा मरिनड्राइव्ह पोलिसांनी घेतला आहे. मरिनड्राइव्ह पोलीस ठाण्याच्या कपाटात तब्बल १२ किलो एमडी दडवून ठेवल्याप्रकरणी त्याच्यावर तेथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी मरिनड्राइव्ह पोलीस काळोखेला उद्या न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागणार आहेत.
मरिनड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या काळोखेला सातारा पोलिसांनी ९ मार्चला अटक केली. पुण्यातील कान्हेरी गावातील काळोखेच्या निवासस्थानाहून सातारा पोलिसांनी एमडी या अत्यंत धोकादायक अमली पदार्थाचा तब्बल ११० किलोचा साठा हस्तगत केला होता. त्यानंतर पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या आदेशानुसार अप्पर आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या उपस्थितीत मरिनड्राइव्ह पोलिसांनी पोलीस ठाण्यात शोधाशोध केली. तेव्हा एका कपाटातून तब्बल १२ किलो एमडीचा साठा हस्तगत करण्यात आला.
पोलिसांनी केलेल्या चौकशीतून अमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्या शशिकला ऊर्फ बेबी पाटणकरचे नाव पुढे आले. काळोखेने गावी व पोलीस ठाण्यात दडवलेला एमडीचा साठा बेबीच्या मालकीचा होता. अटक होण्याच्या काही दिवस आधीपासून काळोखे आणि बेबी कोकणात सोबत फिरत होते. ही माहिती पुढे आल्यानंतर मुंबईचे अमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखा आणि मरिनड्राइव्ह पोलिसांनी बेबीचा शोध सुरू केला आहे.
तपासादरम्यान मुंबई पोलीस दलातल्या आणखी एका पोलीस शिपायाचा सहभाग या रॅकेटमध्ये असावा, असा संशय निर्माण करणारी माहिती पोलिसांना मिळाली. हा पोलीस शिपाई काळोखेच्या सतत संपर्कात होता, असे स्पष्ट झाले. त्याबाबतही मरिनड्राइव्ह पोलीस तपास करणार आहेत.
पोलीस प्रवक्ते, उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार मरिनड्राइव्ह पोलिसांनी सातारा पोलिसांकडून काळोखेचा ताबा घेतला
असून त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाईल.