Join us  

पोलीस आयुक्तांकडून ५० हजार पोलिसांचे कौतुक; सेवा पुस्तकात नोंद होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 2:18 AM

निवडणुकीतील सुरळीत बंदोबस्ताबाबत बक्षीस

मुंबई : महानगरात विधानसभा निवडणुका शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यात महत्त्वपूर्र्ण भूमिका बजाविणाऱ्या ५० हजारांहून अधिक मुंबई पोलिसांची पाठ आयुक्त संजय बर्वे यांनी कौतुकाने थोपटली आहे. ‘निवडणूक काळात कार्यरत असलेल्या अधिकारी व अंमलदारांची चांगली कामगिरी’ म्हणून सेवा पुस्तिकेत नोंद घेण्यात येणार आहे. त्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक किरकोळ अपवाद वगळता सुरळीतपणे पार पडली. आचारसंहिता लागू झाल्यापासून कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले होते. तसेच २१ आॅक्टोबरला मतदान व २४ आॅक्टोबरला मतमोजणी दिवशी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे मुंबई शहर व उपनगरातील निवडणूक सुरळीत पार पडली.

याची दखल घेत या कालावधीत कार्यरत असलेल्या अधिकारी व अंमलदारांना बक्षीस देण्याचा निर्णय आयुक्त संजय बर्वे यांनी घेतला आहे. निवडणूक काळात कार्यरत असलेल्या अधिकारी व अंमलदारांची चांगली कामगिरी, म्हणून सेवा पुस्तिकेत नोंद घेण्यात येणार आहे. घेण्यात येणाºया या नोंदीचा फायदा त्यांना भविष्यातील विशेष सन्मान, शौर्यपदकासाठी पाठविल्या जाणाºया प्रस्तावासाठी होईल. त्याचप्रमाणे बढती व बदलीसाठीही त्याचा उपयोग होणार आहे.

त्यासाठी कॉन्स्टेबल ते साहाय्यक फौजदारापर्यंत संबंधित पोलीस उपायुक्तांना बक्षिसे द्यायची आहेत, तर पीएसआय ते वरिष्ठ निरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांना संबंंधित अपर पोलीस आयुक्तांनी तसेच साहाय्यक आयुक्तांना सहआयुक्त दर्जाच्या अधिकाºयांनी बक्षिसे द्यायची आहेत. त्यांनी यासंदर्भातील आदेश जारी करून त्याबाबतची कार्यवाही त्वरित करून कार्यअहवाल सादर करण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे.गणेशोत्सव बंदोबस्ताबद्दल अद्याप बक्षीस नाहीपोलीस आयुक्तांनी गणेशोत्सव, मोहरमच्या कालावधीत पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना १६ सप्टेंबरला बक्षीस देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पोलिसांमध्येही उत्साह होता. त्यांना अधिक चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, हा यामागील हेतू होता.मात्र काही सहआयुक्त, अपर आयुक्त व उपायुक्तांनी त्याची कार्यवाही केलेली नाही. त्याबाबत अधिकारी-अंमलदारांकडून नाराजी व्यक्त होत आहे. आयुक्त बर्वे यांनी दखल घेत संबंधित अहवालाची तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :पोलिस