पोलिसांनी पकडल्या ४ नल्ला रिक्षा
By Admin | Updated: January 14, 2015 23:06 IST2015-01-14T23:06:35+5:302015-01-14T23:06:35+5:30
कालबाह्य झालेल्या १५ वर्षे जुन्या चार ‘नल्ला’ रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. जुनी रिक्षा असल्याची बतावणी करून ठाण्यातील एका पत्रकारालाच त्यातील एका रिक्षाची विक्री करण्यात आली होती

पोलिसांनी पकडल्या ४ नल्ला रिक्षा
ठाणे : कालबाह्य झालेल्या १५ वर्षे जुन्या चार ‘नल्ला’ रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. जुनी रिक्षा असल्याची बतावणी करून ठाण्यातील एका पत्रकारालाच त्यातील एका रिक्षाची विक्री करण्यात आली होती. त्याची कागदपत्रे मात्र न मिळाल्याने त्याने याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने या प्रकरणाचा छडा लावून यातील रवींद्र पुंडलिक पाटील (४८) याला अटक केली आहे. पाटील हा लोकमान्यनगर, पाडा क्र.-३ येथे राहतो. आपल्याकडे जुनी रिक्षा असून ती तुम्ही जोडधंद्यासाठी घ्या, अशी गळ त्याने या पत्रकाराला घातली. तुम्हाला एका शिफ्टचे ३०० रुपये देण्यात येतील, असेही त्याने सांगितले. जोडधंदा होईल म्हणून या पत्रकारानेही पाटील याच्याकडून ही रिक्षा २१ हजारांत विकत घेतली. या रिक्षाच्या सकाळी ७ ते सायंकाळी ७ या एका शिफ्टमध्ये तो ठरल्याप्रमाणे ३०० रुपये देऊ लागला. पण, रिक्षाच्या मूळ कागदपत्रांची मागणी केल्यावर मात्र टाळाटाळ करू लागला. मुळात, १५ वर्षे जुन्या असलेल्या या रिक्षाला बनावट क्रमांक होता. पर्यावरणाच्या दृष्टीने तसेच जुन्या रिक्षांमुळे होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना धोका होण्याची भीती लक्षात घेता अशा रिक्षांवर राज्य शासनाने बंदी घातली आहे. तरीही ही रिक्षा स्क्रॅप न करता नवीन रिक्षावर तिचे परमिट चढवून ती पुन्हा रस्त्यावर आणण्यात आली होती. तिचे चेसीस, इंजीनही बदलले होते. जादा पैशांच्या हव्यासापोटी पाटीलने या रिक्षासह आणखी काही अशाच नल्ला रिक्षा सुरू ठेवल्या आहेत. याबाबतची तक्रार १३ जानेवारीला रात्री नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केला. (प्रतिनिधी)