पोलिसांनी रोखली बलात्काराची घटना
By Admin | Updated: April 26, 2015 00:52 IST2015-04-26T00:52:58+5:302015-04-26T00:52:58+5:30
वासनांध सहकाऱ्याच्या तावडीत सापडलेल्या तरुणीवरील संभाव्य अत्याचार स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वेगवान हालचाली करत रोखला.

पोलिसांनी रोखली बलात्काराची घटना
मुंबई : वासनांध सहकाऱ्याच्या तावडीत सापडलेल्या तरुणीवरील संभाव्य अत्याचार स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वेगवान हालचाली करत रोखला. हा थरार शनिवारी दुपारी अॅन्टॉप हिलच्या झोपडपट्टीत घडला. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार तरुणी व तरुण वडाळ्यातील एका आलिशान सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. तरुणीने आरोपीकडे काही पैसे उधार मागितले. त्यानेही लगेच होकार दिला. मात्र पैसे घेण्यासाठी तुला माझ्यासोबत यावे लागेल, असे सांगितले. तीही तयार झाली. त्यानुसार त्याने तिला अॅन्टॉप हिल येथील एका खोलीत नेले. तेथे तिच्यासोबत लगट करू लागला. त्याचे इरादे ओळखून तरुणी बाथरूममध्ये पळाली. तेथून तिने मोबाइलद्वारे पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून मदत मागितली. तिने हकीगत सांगितली. मात्र तिला नेमके ठिकाण सांगता येत नव्हते. अखेर नियंत्रण कक्षाने अॅन्टॉप हिल, वडाळा टीटी, सायन, माटुंगा पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांना सतर्क केले. तसेच गुन्हे शाखेच्या युनिट चारलाही वर्दी दिली. सुमारे शंभर पोलीस अधिकाऱ्यांची विविध पथके अॅन्टॉप हिलमध्ये शोधाशोध करू लागली. त्यातच एका पथकाने तरुणीच्या मोबाइल लोकेशनवरून ती खोली शोधून तरुणाला ताब्यात घेतले, तरुणीची सुटका केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणाला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)