Join us  

पैशांचा पाऊस पाडणारा महाराज पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 4:15 AM

चेंबूरचे रहिवासी असलेले भरतभाई पटेल (३०) हे गेल्या काही दिवसांपासून व्यवसायातील आर्थिक तोट्यामुळे निराश होते.

मुंबई : बाजारात अडकलेले पैसे परत मिळवून देत, घरात पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्या सिंधुदुर्गच्या महाराज दयानंद अच्युत मोरे उर्फ दया उर्फ धर्मांकचा आरसीएफ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्याच्यासह नाशिकमधील हस्तक संतोष चव्हाणलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या महाराजने राज्यभरात अशा प्रकारे फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार, ते अधिक तपास करत आहेत.चेंबूरचे रहिवासी असलेले भरतभाई पटेल (३०) हे गेल्या काही दिवसांपासून व्यवसायातील आर्थिक तोट्यामुळे निराश होते. त्याचदरम्यान मेमध्ये ते दयानंद महाराजाच्या संपर्कात आले. महाराजने त्यांचा विश्वास संपादन करत त्यांना पूजापाठद्वारे सर्व संकट दूर होईल, असे आश्वासनदिले.बाजारात अडकलेले पैसेही मिळतील आणि घरात पैशांचा पाऊस पडेल, असे सांगितले. पटेल यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून ५ लाख रुपये दिले. याच दरम्यान नाशिकमध्येही एका व्यवहारादरम्यान ते चव्हाणच्या संपर्कात आले. त्यानेही विविध पूजापाठ करण्याच्या नावाखाली ३ लाख घेतले. मे ते जुलैदरम्यान या दुकलीने पटेल यांच्याकडून ८ लाख रुपये उकळले. पुढे पैशांचा पाऊस पाडून ‘तुझे पैसे परत करू’, असे आश्वासन चव्हाणने दिले.मात्र, ना धंद्यात नफा झाला, ना पैसे मिळाले. उलट कर्ज घेतलेल्या व्यक्तींकडून पैशांसाठी धमकाविणे सुरू झाले. अखेर, पटेलने त्यांना पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. तेव्हा दुकलीने त्याला ‘मंत्रतंत्राचा वापर करून तुला बरबाद करू, आर्थिक नुकसान करू,’अशी धमकी दिली. त्यांच्या कुटुंबातील महिलांवर गलिच्छ आरोप करून त्यांचे मानसिक संतुलन बिघडविण्याचा प्रयत्न केला. मित्रांकडून व्याजावर आणलेले पैसे मिळत नाहीत, त्यातच मंत्रतंत्राची धमकी; यामुळे कंटाळलेले पटेल आत्महत्येच्या विचारात होते. मात्र, हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचताच त्यांनी याची दखल घेत, पटेल यांचे समुपदेशन केले.पटेल यांच्या तक्रारीवरून २ आॅक्टोबर रोजी फसवणुकीसह जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, महाराज बाहेरगावी गेल्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र, त्यांनी त्याच्या चेंबूरच्या घराभोवती वॉच ठेवला होता.यात आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक पंडित पवार, संतोष कदम आणि पथकाने चव्हाणला पकडण्यासाठी नाशिकमध्ये सापळा रचला.पोलिसांनी सापळा रचल्यानुसार याप्रकरणी चव्हाणला पैसे घेण्यासाठी बोलावून त्यानंतर त्याच्यावर पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली. त्यापाठोपाठ या गुन्ह्यांबाबत अनभिज्ञ असलेला दयानंद महाराज चेंबूरच्या घराकडे धडकला. त्याच्याबाबत ही माहिती मिळताच पोलिसांनी त्यालाही अटक केली. सध्या दोघेही १० तारखेपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.सिंधुदुर्गचा भोंदू महाराजमहाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदोस येथे २००३च्या दरम्यान ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचे आमिष दाखवून नऊ जणांची हत्या करण्यात आली होती. याच गावात महाराज राहण्यास आहे. त्याचा यात सहभाग होता का? तसेच त्याने आतापर्यंत किती जणांची फसवणूक केली आहे? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत पैशांचा पाऊस पाडून दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत याचा सहभाग आहे का, याबाबतही पोलीस कसून चौकशी करत आहेत.

टॅग्स :गुन्हेगारी