Join us  

Video : दहीहंडी उत्सवासाठी ४० हजार पोलीस फोर्स ऑन डयुटी !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 9:35 PM

साध्या वेशातील खास पथके तयार

ठळक मुद्देसंशयास्पद व्यक्ती अथवा वस्तू आढळल्यास त्यांची महिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.  जुहू येथील हरे रामा हरे कृष्ण मंदीर (इस्कॉन) या ठिकाणी दहीहंडीसाठी मोठी गर्दी असते.

मुंबई - दरवर्षीप्रमाणे उद्या गोपाळकाला संबंध मुंबईसह देशभरात उत्साहात साजरा होईल. मात्र, या उत्सवाला कुठलेही गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. संबंध मुंबईत ३०३० दहीहंडी मंडळ असून ४० हजाराहून जास्त पोलिसांचा उद्या बंदोबस्त असणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली. मुंबई पोलिसांचा ४० हजारांचा ताफा सज्ज झाला आहे. त्याचप्रमाणे, राज्य राखीव दल, श्वान पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकांना (बीडीडीएस) देखील सतर्कतेचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली. सध्या देशातील वातावरण हे विविध कारणांनी तापलेले आहे. एकीकडे जम्मु काश्मिरमध्ये ३७० कलम रद्द केल्याने अनेक दहशतवादी संघटनांचा तिळपापड झाला आहे. यामुळे या घातकी संघटना घातपात आखण्याचा कट आखत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. तर दुसरीकडे राज्यातील विधानसभा निवडणुकांचा महासंग्राम जवळ आल्याने, या निवडणुकीपूर्वी धमाका करण्यास नक्षलवादी संघटना देखील सरसावल्या असल्याचा इशारा राज्य गुप्तचर विभागाने दिला आहे. तर शहरांत गर्दीचा उत्सव म्हणून दहीहंडी प्रसिद्ध आहे. अशा उत्सवावर विरजण टाकण्यासाठी अनेक दहशतवादी संघटनांसह काही समाजकंटक सज्ज झाले आहेत. यामुळे मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. यावेळी शहरातील विविध ठिकाणी ४० हजार पोलीस अधिकारी - कर्मचारी तैनांत केले आहेत. तसेच जुहू येथील हरे रामा हरे कृष्ण मंदीर (इस्कॉन) या ठिकाणी दहीहंडीसाठी मोठी गर्दी असते. यामुळे या ठिकाणी घातपात होण्याची शक्यता असल्याने, पालिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच ज्या ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर तर राहणारच आहे, मात्र त्यातुनही साध्या वेशातील पोलिसांची पथके सज्ज केली आहेत. अशावेळी महिला आणि तरूणींशी होणाऱ्या छेडछाडीवर देखील नजर ठेवण्यांत येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा सर्व बंदोबस्त सुरु असतानाच, शहरांत एकूण लहान मंडळे ही २ हजार ५११ तर ८७६ मोठी मंडळे अशी ३ हजार ३८७ मंडळे आहेत. या सर्व मंडळानी न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करु नये, याकरीता पोलिस दल सतर्क झाले आहेत. त्यातुन कोणत्याही मंडळाने असा पकार केलाच तर त्या मंडळावर कायदेशीर कारवाई कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच संशयास्पद व्यक्ती अथवा वस्तू आढळल्यास त्यांची महिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.  

टॅग्स :दहीहंडीपोलिसमुंबई