पोलीसही लागले तयारीला

By Admin | Updated: September 24, 2014 03:17 IST2014-09-24T03:17:46+5:302014-09-24T03:17:46+5:30

निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आणि पक्षातल्या इच्छुक उमेदवारांची सध्या एकच धावपळ सुरू आहे. उमेदवार जनतेची मने जिंकण्यासाठी, जास्तीत जास्त मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी धडपडत आहेत

Police also got ready | पोलीसही लागले तयारीला

पोलीसही लागले तयारीला

मुुंबई : निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आणि पक्षातल्या इच्छुक उमेदवारांची सध्या एकच धावपळ सुरू आहे. उमेदवार जनतेची मने जिंकण्यासाठी, जास्तीत जास्त मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी धडपडत आहेत. तर दुसरीकडे निकालापर्यंतची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, मतदारांनी निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजावावा यासाठी मुंबई पोलिसांनीही तयारी सुरू केली आहे.
मुंबईत ३६ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी राजकीय, राजकीय गुन्हे, धार्मिकदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघ कोणते याची चाचपणी मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार संवेदनशील ही मोठी संकल्पना आहे. त्यात विविध प्रकार आहेत. जसे राजकीय पक्षांमधील वैमनस्य, बोगस मतदान, मतदारांवरील दहशत असे राजकीय गुन्हे आणि धार्मिक समीकरणे या विविध पातळ्यांवर मतदारसंघ संवेदनशील ठरविण्यात येतात. सध्या ही प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी जिल्हापातळीवर निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलिसांच्या बैठका सुरू झाल्या आहेत.
संवेदनशील मतदारसंघांमध्ये किती आणि कसा बंदोबस्त द्यावा, शहरातील मतदान केंद्र, मतमोजणी केंद्रांच्या बंदोबस्ताची रणनीती यावर सध्या पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. पोलीस दलाकडे उपलब्ध असलेले आणि प्रत्यक्षात गरज असलेल्या मनुष्यबळाचा हिशोब करून बाहेरून किती फौजफाटा मागवावा लागेल हा अंदाज घेतला जात आहे. लोकसभा निवडणुकीतही मुंबई पोलिसांनी केंद्रीय राखीव पोलीस दल, निमलष्करी दलाच्या तुकड्या केंद्राकडे मागितल्या होत्या.
याशिवाय मतदारांना निर्भीडपणे मतदान करता यावे, राजकीय गुंडांकडून दहशत निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई
सुरू केली आहे. पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी या माहितीस दुजोरा दिला आहे. आचारसंहिता लागू
झाली तेव्हापासून प्रतिबंधात्मक कारवाई सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. या कारवाईत निवडणूक काळात सक्रिय होणारे राजकीय गुन्हेगारांची यादी तयार केली जात आहे. तसेच दारू, शस्त्र तस्करी रोखण्यासाठी विशेष अभियान राबविले जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार किती आणि कोणती प्रतिबंधात्मक कारवाई केली याची माहिती दर दिवशी निवडणूक आयोगाला कळविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Police also got ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.