चिमुकल्यांवर पोलिसांची कारवाई
By Admin | Updated: August 12, 2015 03:44 IST2015-08-12T03:44:05+5:302015-08-12T03:44:05+5:30
प्रत्येकाने शिक्षण घ्यावे, यासाठी पालिका प्रशासन नानाविध शक्कल लढवून प्रयत्न करत असते. मात्र दुसरीकडे ‘आमचा शिक्षणाचा हक्क हिरावू नका’, असा आक्रोश करत शाळेच्या

चिमुकल्यांवर पोलिसांची कारवाई
मुंबई : प्रत्येकाने शिक्षण घ्यावे, यासाठी पालिका प्रशासन नानाविध शक्कल लढवून प्रयत्न करत असते. मात्र दुसरीकडे ‘आमचा शिक्षणाचा हक्क हिरावू नका’, असा आक्रोश करत शाळेच्या इमारतीवरील कारवाई करायला आलेल्या पालिका आणि पोलिसांशी चिमुरड्यांना दोन हात करण्याची वेळ आज आली.
चांदिवली येथील बांगार विद्यालयावर पालिकेचा हातोडा पडणार असल्याची बातमी जशी आली, तसे या शाळेतील शेकडो विद्यार्थी अस्वस्थ झाले होते. शिक्षणाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या या चिमुकल्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला.
मराठी शाळा बंद पडण्याच्या वाटेवर असताना चांदिवली येथील संघर्षनगर परिसरातील कुशाभाऊ बांगार शाळेवरही विकासकाच्या संगनमतामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. चांदिवली येथील संघर्षनगर हा दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. चहूबाजंूनी असलेला डोंगराचा वेढा, त्यात वीज-पाण्याची सततची गैरसोय, खडतर रस्त्यांमुळेही नागरिक नेहमी हैराण असतात. त्यात विद्यार्थ्यांना जवळपास शाळा नसल्याने येथील पडीक जागी २००० साली कुशाभाऊ बांगार शाळेची इमारत उभी राहिली. २०१२ मध्ये शाळेला सरकारमान्य अनुदानित शाळा घोषित करण्यात आले. पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग या शाळेत भरतात. शाळेत सुमारे ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मोक्याच्या ठिकाणी उभारलेल्या या शाळेच्या जागेवर विकासकाची नजर पडली. जागेसाठी विकासकाने न्यायालयात धाव घेत, शाळा परिसराची जागा एमिनिटी प्लॉट दाखवून बांधकाम अनधिकृत असल्यावर विकासकाने शिक्कामोर्तब करून घेतल्याचा आरोप शाळेने केला आहे. १२ जुलै रोजी घरे, धार्मिक स्थळांसह या शाळेच्या इमारतीचे निष्कासन करण्यासाठी पालिकेचे पथक आले. मात्र विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केला होता.
सकाळी १० वाजल्यापासून पालिका प्रशासन पोलिसांच्या फौजफाट्यासह शाळेच्या इमारतीवर कारवाईसाठी आले होते. सुरुवातीला बांगार शाळेलगत असलेल्या सेंट पॉल या अनधिकृत शाळेची खोली निष्कासित करण्यात आली. त्यानंतर पथकाने त्यांचा मोर्चा बांगार शाळेकडे वळविला. शाळेने कारवाईला झुगारून नियमितपणे वर्ग भरवला. मात्र सायंकाळी वर्ग सुटताच शाळेच्या इमारतीवर हातोडा मारण्यास सुरुवात केली. मात्र कारवाईची टांगती तलवार शाळेवर कायम असून बुधवारी पुन्हा पालिकेचे पथक कारवाईसाठी येणार आहे. तथापि, आमचा लढा कायम राहणार असून शाळा तोडली तर विकासकाच्या कार्यालयात वर्ग भरवू, असा इशारा नगरसेवक ईश्वर तायडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.