मोर्बा घाटात खड्डे
By Admin | Updated: November 20, 2014 23:17 IST2014-11-20T23:17:40+5:302014-11-20T23:17:40+5:30
माणगाव तालुक्यातील मोर्बा या वळणदार घाटातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची अक्षरश: दैना झाली आहे.

मोर्बा घाटात खड्डे
पूनम धुमाळ, गोरेगाव
माणगाव तालुक्यातील मोर्बा या वळणदार घाटातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची अक्षरश: दैना झाली आहे. या रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे वाहनचालकांची सध्या डोकेदुखी बनत आहेत. लोकप्रतिनिधींकडून या रस्त्यांकडे नेहमीच पाठ फिरवली जात असून वाहनचालकांसाठी हा घाट म्हणजे मणक्यांच्या आजाराला निमंत्रण देण्यासारखेच आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून साई - मोर्बा या पर्यायी रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग खात्याने सातत्याने पाठ फिरवल्याचेच दिसून येत आहे. म्हसळा, दिवेआगर, हरिहरेश्वर, दिघी-जंजिरा येथे पर्यटन स्थळावर फिरायला जाण्यासाठी माणगाव म्हसळा- श्रीवर्धन या रस्त्यावर नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. मोर्बा घाटातील तीव्र उताराचा रस्ता पूर्णपणे खचला असून रस्त्यालगत संरक्षक कठडे नसल्याने ट्रक दरीत कोसळून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
दिघी पोर्टच्या कामासाठी अवजड वाहनांच्या होणाऱ्या वाहतुकीमुळे माणगाव - म्हसळा या रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. या गाड्यांच्या वाहतुकीमुळेच घाटातील रस्ता अधिक धोकादायक बनत आहे. या घाटातून खासगी वाहनांबरोबरच एसटी बसच्या फेऱ्याही वाढतात, त्यामुळे या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
मोर्बा घाट रस्ता तसेच संरक्षक कठड्यांसाठी मंजुरी मिळाली आहे. घाट रस्त्यावरून दिघी पोर्ट लिमिटेडच्या चाळीस ते पन्नास टन इतक्या वजनाच्या वाहनांची वाहतूक होत असल्याने रस्ते खराब होत असल्याचे महाड सा. बां. विभागाचे अभियंता आर. एम. गोसावी यांनी यावेळी सांगितले.