अशुद्ध बर्फ विकणाऱ्यांवर विषप्रयोगाचा गुन्हा
By Admin | Updated: April 15, 2015 00:22 IST2015-04-15T00:22:28+5:302015-04-15T00:22:28+5:30
उन्हाळ्यामध्ये रस्त्यावर थंड पदार्थ विकणारे विक्रेते बर्फ कुठून आणतात, ते कुठले पाणी वापरतात, या सर्वांवर अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) करडी नजर असणार आहे.

अशुद्ध बर्फ विकणाऱ्यांवर विषप्रयोगाचा गुन्हा
पूजा दामले ल्ल मुंबई
उन्हाळ्यामध्ये रस्त्यावर थंड पदार्थ विकणारे विक्रेते बर्फ कुठून आणतात, ते कुठले पाणी वापरतात, या सर्वांवर अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) करडी नजर असणार आहे. अशुद्ध पाण्याचा, बर्फाचा वापर आढळल्यास भादंविनुसार ३२८ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
एप्रिल महिन्यामध्ये दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत आहे. उष्णता वाढत असल्याने थंडाव्यासाठी रस्त्यावरील लिंबू सरबत, आंबा ज्यूस, बर्फाचा गोळा, आइसक्रीम अशा पेयांना पसंती दिली जाते. पण, यासाठी वापरलेला बर्फ अशुद्ध पाण्यापासून बनवलेला असल्यास त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. अशुद्ध पाण्यामुळे जुलाब, उलट्या, डायरिया, हगवण, कावीळ, पोटाचा संसर्ग असे आजार होऊ शकतात. हे टाळण्यासाठीच एफडीए आता अशा बर्फ विक्रेत्यांवर नजर ठेवणार आहे.
उकाडा वाढल्यावर थंडावा मिळावा, म्हणून शहरी भागात रस्त्यावरील थंड पेय, थंड पदार्थ खाण्याकडे कल अधिक दिसून येतो. यामुळे शहरी भागातील विक्रेत्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. दीड महिन्यापूर्वी वसई, नालासोपारा, विरार या ठिकाणी ११ जणांवर अशुद्ध पाणी वापरल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पिण्यायोग्य पाण्याचा अनेक ठिकाणी तुटवडा असल्याने बर्फासाठी अशुद्ध पाण्याचा वापर वाढतो. यामुळेच बर्फावर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे एफडीएचे सहआयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांनी सांगितले.
हॉटेल्स आणि इतर ठिकाणी खाण्यायोग्य बर्फ विकण्यासाठी परवान्याची आवश्यकता असते. पण, अनेकवेळा बर्फ विकणाऱ्यांकडे परवाना नसतो, असे विक्रेते अशुद्ध पाण्यापासून बर्फ तयार करतात. हे रोखण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. आरोग्याशी हलगर्जीपणा होऊ नये, म्हणून कारवाईसाठी दुसऱ्या जिल्ह्यातूनही काही अधिकारी बोलवून घेण्यास एफडीए आयुक्तांनी परवानगी दिली आहे, असे देशमुख यांनी सांगितले.