मुक्या जनावरांची संजीवनी कागदावरच
By Admin | Updated: November 30, 2014 22:33 IST2014-11-30T22:33:05+5:302014-11-30T22:33:05+5:30
जिल्ह्यात लाखो रुपयांची औषधे वापराविना पडून असतानाच दुसरीकडे मात्र प्रतिबंधक लसींचा साठा नसल्याने मुक्या जनावरांचे जीव धोक्यात आले आहेत.

मुक्या जनावरांची संजीवनी कागदावरच
आविष्कार देसाई, अलिबाग
जिल्ह्यात लाखो रुपयांची औषधे वापराविना पडून असतानाच दुसरीकडे मात्र प्रतिबंधक लसींचा साठा नसल्याने मुक्या जनावरांचे जीव धोक्यात आले आहेत. सर्प आणि श्वानदंशाने घायाळ झालेल्या पशुधनाचे जीव वाचविण्यासाठी संजीवनी ठरणारी ही औषधे सरकारने तातडीने पुरवावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
रायगड जिल्हा औद्योगिक प्रगतीकडे झेपावत असला तरी, या ठिकाणी ग्रामीण भागात शेती आणि शेतीशी निगडित असणारे व्यवसाय केले जातात. यामध्ये प्रामुख्याने गाई, म्हशी, शेळी, कोंबडी पालन होते. या जोडधंद्यातून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळत असते. शेतकरी आपापल्या जनावरांना स्वत:च्या जीवापाड जपतात. या पशुधनाला साप नाहीतर कुत्रा चावल्यास त्याचा जीव वाचविण्यासाठी त्याला तातडीने औषधोपचार मिळणे आवश्यक आहे, मात्र पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधूनही तेथे प्रभावी औषधेच नसल्याने शेतकरी हवालदिल होतो.
अलिबाग येथील दवाखान्यातून प्रतिबंधक लसीची मागणी सरकार दरबारी केली असून ती अद्याप हातात आली नसल्याचे सहायक आयुक्त पशुसंवर्धन गौतम खरे यांनी लोकमतला सांगितले. १० एमएलच्या १०० श्वानदंश प्रतिबंधक लसीची मागणी केली आहे. सर्पदंशावरील पॅम या प्रकारातील २० एमएलची २००, तर व्हेनॉमची २.५ एमएलची २५ प्रतिबंधक लसींचा समावेश आहे.