पोईसर प्रकल्पबाधितांना स्थानिक ठिकाणीच घर हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:09 IST2020-12-05T04:09:27+5:302020-12-05T04:09:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भारतीय जनता पक्षाने कांदिवलीत पोईसर नदी रुंदीकरणातील बाधित होणाऱ्या झोपडपट्टीधारकांना चेंबूर येथे पाठविण्याच्या ...

पोईसर प्रकल्पबाधितांना स्थानिक ठिकाणीच घर हवे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय जनता पक्षाने कांदिवलीत पोईसर नदी रुंदीकरणातील बाधित होणाऱ्या झोपडपट्टीधारकांना चेंबूर येथे पाठविण्याच्या निर्णयाविरोधात शुक्रवारी धरणे आंदोलन केले. प्रकल्पबाधितांना स्थानिक ठिकाणीच घरे मिळायला हवीत. सरकारने आपला हट्ट कायम ठेवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही भाजपने दिला आहे.
मुंबई भाजपचे प्रभारी अतुल भातखळकर यांच्यासह उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि प्रकल्पबाधित उपस्थितांनी आज धरणे आंदोलन केले. पोईसर नदी रुंदीकरणात पोईसर, हनुमान नगर व परिसरातील घरे बाधित होत आहेत. या विषयांत २०१८ साली प्रकल्पबाधितांना स्थानिक ठिकाणीच घरे देण्याचा निर्णय झाला होता. परंतु आता मुंबई उपनगर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हट्टापायी ती घरे पोईसर नदी रुंदीकरण प्रकल्पबाधितांना न देता माहुलवासीयांना देण्याचा अन्यायकारक निर्णय घेण्यात आला आहे. तर, पोईसर व हनुमान नगर येथील बाधितांना चेंबूरला पाठविण्याचा डाव सुरू झाला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या या अन्यायकारक व अव्यवहारीक निर्णयाविरुद्ध धरणे आंदोलन करण्यात आले.
ठाकरे सरकारने घेतलेला ‘तुघलकी’ निर्णय त्यांनी तत्काळ मागे घेऊन प्रकल्पबाधितांना स्थानिक ठिकाणीच घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली. ठाकरे सरकारने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही अधिक ताकदीने संघर्ष करू, असे इशाराही सरकारला दिला.