Join us  

सांगलीतील बाळाला पुराच्या पाण्यामुळे झाला न्यूमोनिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 3:05 AM

कोल्हापूर-सांगली भागात गेल्या १०-१५ दिवसांत पावसाने हाहाकार माजविला असून त्यामुळे आलेल्या महापुरामुळे अनेक गावांत पाणी शिरले, अनेकांचा संसार पुरात वाहून गेला.

मुंबई : कोल्हापूर-सांगली भागात गेल्या १०-१५ दिवसांत पावसाने हाहाकार माजविला असून त्यामुळे आलेल्या महापुरामुळे अनेक गावांत पाणी शिरले, अनेकांचा संसार पुरात वाहून गेला. आता पुराचे पाणी ओसरले असले तरी आजार, रोगराईमुळे येथील रहिवाशांचे तसेच लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आलेले पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारे सांगलीतील शिंदे कुटुंबाच्या २ महिन्यांच्या शिवण्या या चिमुरडीला पुरातून वाचविण्यात एनडीआरएफ पथकाला यश आले असले तरी ती पुराच्या पाण्यामुळे न्यूमोनियाग्रस्त झाली. पुढे उपचार सुरू असताना तिला हृदयदोष असल्याचे समोर आल्याने शिंदे कुटुंब हवालदिल झाले. तिला पुढील उपचारासाठी मुंबईला हलविणे गरजेचे असल्याने एका सामाजिक संस्थेच्या मदतीने त्यांनी मुंबई गाठली असून आता तिच्यावर मुंबईतील वाडिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.भाजी विक्रेता असलेले संदीप शिंदे यांचा संसार पुरात वाहून गेला आहे. पुरातून पुन्हा उभारी कशी घ्यायची या विवंचनेत असतानाच त्यांच्यावर दुसरा मोठा आघात झाला तो म्हणजे आपल्या काळजाचा तुकडा असलेल्या चिमुरडीला हृदयदोष असल्याचे त्यांना समजले. शिवण्याला या जीवन-मरणाच्या संघर्षातून बाहेर काढण्यासाठी शिंदे कुटुंबासह आता वाडिया रुग्णालयही अथक प्रयत्न करत आहे. तिला वाचविण्यासाठी डॉक्टरांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.हृदयावर शस्त्रक्रिया करणार‘आम्ही या बाळाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहोत. आता बाळाची प्रकृती स्थिर असून न्यूमोनिया थोडा कमी झाला आहे. दरम्यान, सोमवारी किंवा त्यानंतर बाळावर हृदयाची शस्त्रक्रिया केली जाईल. शस्त्रक्रिया करणे आवश्यक असून ती न केल्यास पुढे बाळाला त्रास होऊ शकेल,’ अशी माहिती वाडिया रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका डॉ. शकुंतला प्रभू यांनी दिली. विशेष म्हणजे वाडिया रुग्णालयाकडून या बाळावरील सर्व उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बाळाच्या उपचारासह शिंदे कुटुंबीयांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्थाही रुग्णालय पाहत आहे.

टॅग्स :आरोग्यपूर