Join us  

एकेकाळी देशावर एकछत्री अंमल गाजवणाऱ्या काँग्रेसला मोदींनी...; भाजपा आमदाराचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2022 1:18 PM

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर काँग्रेसवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ट्विटरच्या माध्यमातून ते राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करत असतात.

मुंबई-

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर काँग्रेसवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ट्विटरच्या माध्यमातून ते राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करत असतात. राजकीय मुद्द्यांवरुन ते ट्विटरवर चांगलेच सक्रिय असतात. नुकतंच त्यांनी केलेलं एक ट्विट आता चर्चेचा विषय ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला अक्षरश: भिकेला लावलं असल्याचा सणसणीत टोला अतुल भातखळकर यांनी काँग्रेसला लगावला आहे. 

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा एक उमेदवार सध्या घरोघरी जाऊन भिकारी समजून मत द्या अशी विनवणी करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. या उमेदवाराची उत्तराखंडमध्ये जोरदार चर्चा देखील सुरू आहे. याच बातमीचा दाखला देत अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यासाठी भातखळकरांनी 'लोकमत'नं केलेली बातमी देखील ट्विट केली आहे.

"उत्तराखंडमधील काँग्रेसचा एक उमेदवार घरोघरी जाऊन भिकारी समजून मत द्या अशी मतदारांकडे भीक मागतो आहे. एकेकाळी देशावर एकछत्री अंमल गाजवणाऱ्या काँग्रेसला मोदीजींनी अक्षरश: भिकेला लावले आहे", असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. 

उत्तराखंडमधील काँग्रेस उमेदवाराची चर्चाउत्तराखंडमधील तेहरी गरवाल जिल्ह्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला काँग्रेस उमेदवार लोकांच्या दारावर जाऊन भिकारी समजून तरी मतदान करा, अशी विनवणी करताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस उमेदवाराच्या या अनोख्या प्रचाराची संपूर्ण राज्यात चर्चा होत आहे. 

तेरही गरवाल येथील घनसाली विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार धनीलाल शाह आपलं नशीब आजमावात आहेत. निवडणूक प्रचारात ते घरोघरी जाऊन मत देण्याचं आवाहन मतदारांना करत आहेत. भिक समजून मला मत द्या असं म्हणत धनीलाल शाह जनतेशी घरोघरी जाऊन बराच वेळ चर्चा देखील करत आहेत. "मला तुमच्यावर खूप विश्वास आहे की तुम्ही मला विधानसभेवर नक्की पाठवाल. तुम्ही जर मला मत देऊ शकत नसाल तर माझा पराभव झाल्यानंतर माझ्या पार्थिवावर एक-एक लाकूड नक्की टाकायला या", अशीही भावनिक साद धनीलाल शाह मतदारांना घालत आहेत. 

 

टॅग्स :अतुल भातखळकरभाजपाउत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२