भूखंडांच्या किमतीत वाढ
By Admin | Updated: June 27, 2015 01:26 IST2015-06-27T01:26:10+5:302015-06-27T01:26:10+5:30
सिडकोने भूखंडांच्या आधारभूत किमतीत मोठी वाढ केल्याने घरांच्या किमतीही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे

भूखंडांच्या किमतीत वाढ
नवी मुंबई : सिडकोने भूखंडांच्या आधारभूत किमतीत मोठी वाढ केल्याने घरांच्या किमतीही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिडकोने जमीन विक्री धोरणात सुधारणा केल्या आहेत. संचालक मंडळाने या सुधारित धोरणाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार विविध कारणांसाठी असलेल्या भूखंडांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. त्याचा फटका गृहप्रकल्पांना बसण्याची भीती आहे.
यावर्षीच्या धोरणानुसार विविध गटांसाठी विकसित नोडमध्ये सिडकोने बांधलेल्या घरांच्या आधारभूत जमीन मूल्यात २५ ते २५0 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. विकसनशील नोडमध्ये ही वाढ २00 टक्के आहे. त्यामुळे सिडकोने बांधलेल्या व नियोजित असलेल्या गृहप्रकल्पांतील घरांच्या किमतीत वाढ होणार आहे. धार्मिक व आध्यात्मिक वापराच्या भूखंडाच्या आधारभूत किमतीत ५00 चौ.मी.पर्यंत २0 टक्के तर ५0१ ते १000 चौ.मी.पर्यंत ३0 टक्के वाढ केली आहे. १00१ ते २000 चौ.मी.च्या भूखंडाच्या आरक्षित किमतीत ५0 टक्के वाढ करण्यात आली आहे.