सोहळ्यांसाठी मैदाने दिली जाऊ नयेत!

By Admin | Updated: May 14, 2015 01:05 IST2015-05-14T01:05:33+5:302015-05-14T01:05:33+5:30

महापालिका क्षेत्रातील शाळांलगतच्या तसेच इतर खेळांच्या मैदानांत लग्नसोहळ्यांना परवानगी देण्यास मनसेने विरोध केला आहे

Playgrounds should not be given for the ceremony! | सोहळ्यांसाठी मैदाने दिली जाऊ नयेत!

सोहळ्यांसाठी मैदाने दिली जाऊ नयेत!

नवी मुंबई : महापालिका क्षेत्रातील शाळांलगतच्या तसेच इतर खेळांच्या मैदानांत लग्नसोहळ्यांना परवानगी देण्यास मनसेने विरोध केला आहे. अशा सोहळ्यांमुळे परिसरातील खेळाडूंची गैरसोय होत असल्याने त्यांनी यासंबंधीची मागणी पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली. तसेच खेळांच्या मैदानांवर विविध सुविधा देण्याचीही मागणी त्यांनी बैठकीत केली आहे.
महापालिकेतर्फे क्रीडा स्पर्धांना विशेष महत्त्व दिले जात आहे. शहरात उत्तम खेळाडू घडावेत यासाठी विविध स्पर्धांचेही आयोजन केले जाते. मात्र दुसरीकडे प्रशासनाच्याच उदासीनतेमुळे खेळाडूंचीच गैरसोय होत आहे. काही मैदानांवर लगतच्या शाळा व्यवस्थापनांनी कब्जा केला आहे. तर काही मैदानांवर सतत विविध
कार्यक्रम अथवा लग्नसोहळे होत असतात.
या सोहळ्यांच्या जय्यत तयारीमुळे किमान तीन दिवस परिसरातील तरुणांना
मैदानांवर खेळायला मिळत नाही. यामुळे तरुणांची गैरसोय
टाळण्यासाठी खेळाची मैदाने लग्नसोहळ्यासाठी देणे पालिकेने बंद करावे, अशी मागणी मनसेने केली आहे. याकरिता मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली.
यावेळी झालेल्या चर्चेत आयुक्तांनीही सकारात्मक भूमिका घेत मैदानांमध्ये सुविधा पुरविण्याचे आणि खेळाडूंच्या गरजा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तसेच मैदानांच्या सुविधांबाबत निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचाही निर्णय त्यांनी घेतल्याचे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Playgrounds should not be given for the ceremony!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.