Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘प्लॅटफॉर्म तिकीट’ विक्री आठ दिवस बंद ठेवणार; महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 05:43 IST

प्रवास सुलभ व्हावा, यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्यांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर) होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर ‘प्लॅटफॉर्म तिकीट’ विक्री तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २ ते ९   डिसेंबरपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांची गैरसोय टाळून प्लॅटफॉर्मवरील गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे रेल्वेने सांगितले. प्रवास सुलभ व्हावा, यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्यांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.

बंदी कुठे?

मुंबई विभाग : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि कल्याण.

भुसावळ विभाग : बडनेरा, अकोला, नांदुरा, मूर्तिजापूर, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक.

नागपूर विभाग : नागपूर आणि वर्धा

पुणे विभाग : पुणे

सोलापूर विभाग : सोलापूर.