Join us  

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांतील प्लाझ्मा सर्वसामान्यांनाही मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 3:36 AM

पालिकेमार्फत आयोजित प्लाज्मा दान मोहिमेला अनेक स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मुंबई : पालिका रुग्णालयांत रक्ताप्रमाणे प्लाझ्माही आता सशुल्क सर्वसामान्यांना उपलब्ध केले जाणार आहे. कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी जीवनदान ठरत आहे. मात्र यापूर्वी दान केलेला प्लाझ्मा फक्त त्याच रुग्णालयातील रुग्णांसाठी वापरता येत होता. याबाबत प्रशासनाने काढलेल्या सुधारित परिपत्रकानुसार आता केईएम, नायर आणि सायन रुग्णालयात सर्वसामान्यांना प्लाझ्मा उपलब्ध होणार आहे. मात्र त्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक असणार आहे.पालिकेमार्फत आयोजित प्लाज्मा दान मोहिमेला अनेक स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. केईएम, नायर आणि सायन रुग्णालयांच्या डॉक्टरांकडून या तीन रुग्णालयांमध्ये प्लाझ्माचे संकलन करण्यात आले आहे.मात्र प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तीला आपल्या नातेवाईक किंवा अन्य कोणाला रुग्णालयांकडून प्लाझ्मा मिळवून द्यायचा असल्यास तशी कायद्यात तरतूद नाही. दान केलेला प्लाझ्मा फक्त त्याच रुग्णालयातील रुग्णांसाठी वापरता येत होता.बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला प्लाझ्मा उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे अनेक जण प्लाज्मा दान करण्याबाबत पुनर्विचार करू लागले होते. लोकांची ही नाराजी स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिका प्रशासनाला कळवली. याबाबत चर्चा केल्यानंतर अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सुधारित परिपत्रक काढले आहे. त्यामुळे केईएम, नायर आणि सायन रुग्णालयात जमा करण्यात आलेले प्लाज्मा आता सर्वसामान्यांना सशुल्क उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस