७० हजार वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2015 22:43 IST2015-06-27T22:43:59+5:302015-06-27T22:43:59+5:30
उरण-पनवेल वनविभागाच्या एकूण वनक्षेत्राच्या ४० टक्के क्षेत्रात वनसंपदा बहरलेली असून यंदाच्या पावसाळ्यात उरण तालुक्यातील कोप्रोली वनक्षेत्रात

७० हजार वृक्षांची लागवड
उरण : उरण-पनवेल वनविभागाच्या एकूण वनक्षेत्राच्या ४० टक्के क्षेत्रात वनसंपदा बहरलेली असून यंदाच्या पावसाळ्यात उरण तालुक्यातील कोप्रोली वनक्षेत्रात २८ विविध प्रकारच्या ७० हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाचे आएफओ सी. व्ही. मरांडे यांनी दिली.
उरण-पनवेल विभागात एकूण ३६७५.०३ हेक्टर वनक्षेत्र आहे. यामध्ये २७१०.३६ वनक्षेत्र आणि राखीव ५७५.७८ हेक्टर संरक्षित वनक्षेत्र आहे. तर ३८८.९९ हेक्टर संपादित वनक्षेत्र आहे. एकूण वनक्षेत्रापैकी ४० टक्के वनक्षेत्रात वनसंपदा बहरलेली आहे. २०० हेक्टर वनजमीन क्षेत्र खारफु टी वनस्पतीने आच्छादले असल्याची माहिती वनविभागाचे आरएफओ सी. व्ही. मरांडे यांनी दिली. उरण-पनवेल परिसरात अनेक प्रकल्प, कंपन्या आल्या आहेत. त्यामध्ये उरण परिसरातील प्रकल्प आणि कंपन्यांची संख्या अधिक आहे. जेएनपीटी, ओएनजीसी, एनएडी, बीपीसीएल, जीटीपीएस आणि देशातील नंबर वन जेएनपीटी बंदर आदी प्रकल्प आणि कंपन्यांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात दगड-मातीचा भराव करण्यात आला आहे. विकासकामांच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात झालेल्या दगड-मातीच्या भरावाच्या कामासाठी उरण-पनवेल परिसरातील डोंगर, टेकड्या आदी अमूल्य नैसर्गिक वनसंपदा याआधीच नष्ट झाली आहे. सातत्याने नष्ट होणाऱ्या वनसंपदेमुळे परिसरात याआधी वास्तव्यास असलेल्या विविध प्रकारचे आकर्षक पक्षी, प्राण्यांची संख्याही प्रमाणापेक्षा घटली आहे. प्रचंड प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे वास्तव्याची ठिकाणे नष्ट झाल्याने आणि विपुल प्रमाणात मिळणारे खाद्य मिळेनासे झाल्याने दुर्मीळ आकर्षक पक्षी, प्राण्यांची संख्या परिसरात प्रचंड प्रमाणात रोडावली आहे. त्याशिवाय नैसर्गिक साधनसंपदा लोप पावत आहे. (वार्ताहर)