सायबर भामट्याच्या अटकेसाठी विमान थांबवले
By मनीषा म्हात्रे | Updated: January 12, 2024 19:27 IST2024-01-12T19:27:34+5:302024-01-12T19:27:45+5:30
सायबर गुन्हयातील आरोपीस पुणे विमानतळावरून गोव्याला निघण्याच्या तयारीत असलेले विमान थांबवुन ताब्यात घेतले.

सायबर भामट्याच्या अटकेसाठी विमान थांबवले
मुंबई: महागडा मोबाईल विक्रीच्या नावाखाली ८४ हजारांची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यासाठी पोलिसांनी विमान थांबवले. सीआयएसएफच्या मदतीने पुण्याहून गोव्याला निघालेलया आरोपीला अटक केली आहे. गणेश अशोक भालेराव (२९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलीस अधिक तपास करत आहे.
९ सप्टेंबर रोजी मुलुंड परिसरात राहणारे तक्रारदार हे घरी असताना ओएलएक्स अॅपवरून अनोळखी व्यक्तीने कॉल करून राजेंद्र कोळी बोलत असल्याचे सांगितले. त्याच्याकडे एक आयफोन १४ प्रो मोबाईल असून तो मुलुंडच्या एका शॉपमध्ये विक्रीसाठी ठेवला असल्याचे सांगितले. तो बघितल्यानंतर त्याचा पेयमेन्ट करण्याचा सल्ला देत विश्वास संपादन केला. महिलेनेही होकार देताच त्यांच्या खात्यातून ८४ हजार रुपये अन्य बँक खात्यावर पाठवण्यास भाग पाडले. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, मुलुंड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला.
तपासादरम्यान आरोपी हा त्याच्या मैत्रिणींसह पुण्याहून गोव्याला विमानाने जात असल्याची माहिती मिळाली. तपास पथकाने तात्काळ पुणे विमानतळावरील सीआयएसएफच्या मदतीने निघण्याच्या तयारीत असलेले जेट एअरवेजचे विमान थांबवून आरोपी गणेश अशोक भालेराव (२९) याला अटक केली. तो पुण्यातील खराडी भागातील रहिवासी आहे. आरोपीकडून फसवणूक केलेली ८४ हजार रुपयांची रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीकडे अधिक तपास सुरु आहे.