‘सिद्धिविनायक’च्या ठिकाणी उद्यान!
By Admin | Updated: November 14, 2015 03:30 IST2015-11-14T03:30:17+5:302015-11-14T03:30:17+5:30
बृहन्मुंबई महापालिकेद्वारे तयार करण्यात आलेला प्रस्तावित ‘प्रारूप विकास नियोजन आराखडा २०१४ - २०३४’चेही दिवाळे निघाले आहे.

‘सिद्धिविनायक’च्या ठिकाणी उद्यान!
मनोहर कुंभेजकर, मुंबई
बृहन्मुंबई महापालिकेद्वारे तयार करण्यात आलेला प्रस्तावित ‘प्रारूप विकास नियोजन आराखडा २०१४ - २०३४’चेही दिवाळे निघाले आहे. महापालिकेसमोरील पत्रकार संघ, प्रेस क्लब आणि काँग्रेस भवन ही सरकारी कार्यालये असल्याचे या प्रारूप आराखड्यात नमूद आहे. त्यामुळे हा आराखडा की ओरखडा, असाच प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे सिद्धिविनायक मंदिराच्या जागी उद्यान दाखवण्यात आले आहे.
यापूर्वीच्या विकास आराखड्यात अनेक चुकांबाबत ‘लोकमत’ने सर्वप्रथम आवाज उठविल्यानंतर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेच्या पूर्वीच्या विकास आराखड्यातील चुका दुरुस्त करून नवा आराखडा तयार करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. माजी सनदी अधिकारी रामनाथ झा यांनी पालिकेचे माजी आयुक्त सीताराम कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यावर नागरिकांकडून अनेक आक्षेप नोंदविण्यात आले होते.
या सगळ््याचा अभ्यास करून नवीन प्रारूप विकास नियोजन आराखडा बनवण्यात आला. या प्रारूप विकास नियोजन आराखड्यातही अनेक चुका असल्याचा आरोप वॉच डॉग फाउंडेशन या अशासकीय संस्थेचे ग्रॉडफे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा यांनी केला आहे. महानगरपालिका मुख्यालयासमोरील मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब, काँग्रेस भवन यांची जागा सरकारी कार्यालय म्हणून निर्देशित करण्यात आली आहे. तसेच के (पूर्व) येथील प्रसिद्ध महाकाली गुंफांची नोंद इतर सामाजिक सुविधा या प्रणालीत करण्यात आली आहे.
प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या जागी उद्यानाची जागा दाखविण्यात आली आहे. सिद्धिविनायक मंदिराबाहेरील परिसराबाबत पूर्वीच्या विकास आराखड्यात दाखवण्यात आलेल्या चुका मात्र दुरुस्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत महापालिकेच्या संबंधित खात्याद्वारे संपूर्ण महापालिका क्षेत्रात नामनिर्देशन सर्वेक्षण करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण महापालिकेच्या ६६६.ेूॅे.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या सर्वेक्षणाबाबत नागरिकांनी त्यांची निरीक्षणे ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदवावीत, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.