मुंबईतील ६०,००० विद्यार्थिनींसाठी पीयूष गोयल यांचा ४.२ लाख सॅनिटरी पॅड्सचा महाउपक्रम सुरू
By मनोहर कुंभेजकर | Updated: December 3, 2025 18:59 IST2025-12-03T18:58:50+5:302025-12-03T18:59:11+5:30
मोफत सॅनिटरी पॅड वितरणाच्या या महाउपक्रमाच्या शुभारंभामुळे मुलींच्या स्वच्छता, सन्मान व आरोग्याच्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर एक आदर्श निर्माण झाला आहे.

मुंबईतील ६०,००० विद्यार्थिनींसाठी पीयूष गोयल यांचा ४.२ लाख सॅनिटरी पॅड्सचा महाउपक्रम सुरू
मुंबई :उत्तर मुंबईचे खासदार व केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी विद्यार्थिनींच्या सन्मानात वाढ आणि आत्मविश्वास वृद्धीचे ध्येय लक्षात घेऊन मुंबईतील सर्व महानगरपालिका शाळांमधील सुमारे ६०,००० मुलींना दर महिन्याला मोफत सॅनिटरी पॅड्स देण्याच्या महा-उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. या उपक्रमांतर्गत दर महिन्याला तब्बल ४,२०,००० सॅनिटरी पॅड्सचे वितरण करण्यात येणार आहे. यामुळे मुलींचे शिक्षण किंवा सन्मान मासिक पाळीविषयक स्वच्छता साधनांच्या अभावामुळे कोणत्याही प्रकारे खंडित होणार नाही, याची खात्री गोयल यांच्या पुढाकारातून करण्यात आली आहे.
पीयूष गोयल यांनी नुकेतच उद्घाटन केलेल्या मुंबई पब्लिक स्कूल, मंडपेश्वर या महापालिका शाळेतील विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड्स वाटप करून या उपक्रमाची सुरुवात केली. या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, शाळांमध्ये सॅनिटरी उत्पादने उपलब्ध करून देणे हे मुलींच्या आत्मविश्वास, स्वावलंबन, आरोग्य आणि अखंडित शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
पीयूष गोयल म्हणाले की, “हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ सारख्या उपक्रमांद्वारे देशातील मुलींना शिक्षण, आत्मसन्मान आणि प्रगतीची संधी उपलब्ध करून देण्याची दिशा त्यांनी दाखवली आहे.”
२०१४ पासून देशातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांच्या बांधकामाला चालना देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प हा मुलींच्या सन्मान, सुरक्षितता, आरोग्य आणि कल्याणासाठी मोठे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी पीयूष गोयल यांनी महापालिका शिक्षण विभागाला ‘पॅडमॅन’ आणि ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ यांसारखी चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे स्वच्छता आणि आरोग्याबाबत व्यापक जनजागृती होईल. तसेच गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रव्यापी मोहिमेचा उल्लेख केला ज्यामध्ये देशातील शाळांमध्ये स्वतंत्र शौचालये बांधण्याचे कार्य यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.
मोफत सॅनिटरी पॅड वितरणाच्या या महाउपक्रमाच्या शुभारंभामुळे मुलींच्या स्वच्छता, सन्मान व आरोग्याच्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर एक आदर्श निर्माण झाला आहे. हा उपक्रम मुलींच्या आत्मविश्वासात वाढ करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी चालना देणारा ठरेल आणि त्यांच्या उज्ज्वल, सक्षम व प्रगत भविष्याची वाट मोकळी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला