पियुष गोयल यांच्या हस्ते सीप्झ मध्ये नेस्ट-२ चे लोकार्पण
By मनोहर कुंभेजकर | Updated: December 11, 2025 18:52 IST2025-12-11T18:50:58+5:302025-12-11T18:52:42+5:30
पियूष गोयल यांचा तंत्रज्ञानाधारित प्रगतीचा मंत्र

पियुष गोयल यांच्या हस्ते सीप्झ मध्ये नेस्ट-२ चे लोकार्पण
मनोहर कुंभेजकर, मुंबई: अंधेरी पूर्व येथील सीप्झ-सेझने आज आपल्या बदलत्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा गाठत न्यू एंटरप्रायझेस अँड सर्व्हिस टॉवर ( नेस्ट -२) चे लोकार्पण केले. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल आणि उद्योग क्षेत्रातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री पियूष गोयल म्हणाले की,सीप्झ मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. कमी वीजदर, ‘वेस्ट-टू-वेल्थ’ मोहीम, डिजिटल प्रक्रिया आणि मजबूत प्रशासनामुळे सीप्झ नव्या युगात प्रवेश करत आहे.प्रामाणिकता, पारदर्शकता आणि जबाबदार कामकाज हाच खऱ्या प्रगतीचा पाया आहे,” असे सांगत त्यांनी उद्योगांना जबाबदार पद्धती अवलंबण्याचे आवाहन केले. सरकार ‘जन विश्वास’ — विश्वासावर आधारित शासन, कायदे सुलभ करणे आणि ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ वाढवणे यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
आधुनिक पायाभूत सुविधा आणि २०४७ पर्यंतच्या $३०–३५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या ध्येयासह भारत वेगाने पुढे जात आहे.सीप्झ नेही या वेगाशी जुळून घ्यावे,असे त्यांनी स्पष्ट केले.
सीप्झचे झोनल डेव्हलपमेंट कमिशनर ज्ञानेश्वर पाटील (आयएएस) यांनी नेस्ट-२ हे सीप्झच्या परिवर्तनातील महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. तीनपट मोठा नेस्ट-३ प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी जाहीर केले.
महसूल ८३ कोटींवरून १२० कोटी, तर ‘वेस्ट-टू-वेल्थ’ ८० लाखांवरून ११.६६ कोटींवर वाढल्याची माहिती त्यांनी दिली. देशातील पहिले सीप्झ-ईआरपी,२४x७ कस्टम्स, आणि ई-कॉमर्स निर्यातीसाठी पहिला फॉरेन पोस्ट ऑफिस ही मोठी पावले असल्याचे त्यांनी नमूद केले. सीप्झच्या
विकासासाठी एमआयडीसी कडून ग्लोबल एफएसआय मंजूरी अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
एसजीजेएमएचे अध्यक्ष आदिल कोतवाल यांनी सांगितले की एप्रिल–नोव्हेंबर दरम्यान सीप्झची निर्यात ३०% वाढून ३०००० कोटींवर पोहोचली आहे. भारताच्या दागिने उद्योगाच्या जागतिक ओळखीला अधिक बळ देण्यासाठी सिंगल-विंडो क्लिअरन्स सिस्टम २०२६ पर्यंत लागू करण्याची मागणी त्यांनी केली.
कार्यक्रमाचा समारोप सीप्झला स्पर्धात्मक, पारदर्शक आणि नवोन्मेषक निर्यात केंद्र बनवण्याच्या नव्या संकल्पाने झाला.