पियुष गोयल यांची बोरीवली पश्चिमेला रिक्षा चालकांसोबत चाय पे चर्चा
By मनोहर कुंभेजकर | Updated: December 8, 2025 19:32 IST2025-12-08T19:31:21+5:302025-12-08T19:32:04+5:30
शेकडो रिक्षाचालकांनी या कार्यक्रमात हजेरी लावून समस्यांविषयी आणि अपेक्षांविषयी सविस्तर संवाद साधला.

पियुष गोयल यांची बोरीवली पश्चिमेला रिक्षा चालकांसोबत चाय पे चर्चा
मनोहर कुंभेजकर, मुंबई: बोरीवली (पश्चिम) येथे काल रिक्षाचालकांसोबत आयोजित ‘चाय पे चर्चा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री तसेच उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल हे काल दुपारी डॉन बॉस्को शाळेसमोर, एल.टी. रोडवरील बच्छेलाल टी हाऊस येथे झालेल्या या संवादात सहभागी झाले. शेकडो रिक्षाचालकांनी या कार्यक्रमात हजेरी लावून समस्यांविषयी आणि अपेक्षांविषयी सविस्तर संवाद साधला.
संवादाच्या सुरुवातीला रिक्षाचालकांना अभिवादन करत गोयल म्हणाले की,“रिक्षाचालक हे मुंबईच्या गतीचे हृदय आहेत. ऑफिस, शाळा, रुग्णालय, घरे — दररोज कोट्यवधी मुंबईकरांना सुरक्षित पोहोचवणारे तुम्हीच आहात. मी स्वतः अनेकदा रिक्षाने प्रवास करतो; जिथे कार पोहोचू शकत नाही, तिथे रिक्षा त्वरित पोहोचते. त्यामुळे मी मनापासून तुमचे सलाम करतो.
मुंबई बदलते आहे आणि या बदलाचे खरे शिल्पकार तुम्ही रिक्षाचालक आहात. तुमच्या सन्मानासाठी, सुविधांसाठी आणि तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही ठामपणे तुमच्यासोबत असल्याची त्यांनी ग्वाही दिली.
रिक्षाचालकांच्या आर्थिक अडचणींवर ठोस पावले
संवादादरम्यान अनेक रिक्षाचालकांकडे स्वतःची रिक्षा नसल्याचे आणि सीएनजीच्या वाढत्या किमतींमुळे उत्पन्नात घट झाल्याचे समोर आले. यावर प्रतिक्रिया देताना गोयल म्हणाले जी,अर्ध्याहून अधिक चालकांकडे स्वतःची रिक्षा नाही. सीएनजीच्या समस्येमुळे त्यांचे उत्पन्न कमी झाले आहे. स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे मी आत्ताच बजाज आणि महिंद्रा कंपन्यांशी चर्चा केली आहे. आमची कल्पना आहे की १००-१०० जणांचे वेल्फेअर ग्रुप तयार करून त्यांना कमी किमतीत, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक रिक्षा उपलब्ध करून देता येतील. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल आणि प्रदूषणही कमी होईल. तसेच रिक्षाचालकांच्या मुलांसाठी कौशल्य विकास केंद्रांद्वारे रोजगार संधी निर्माण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
चाय पे चर्चा' उपक्रम रिक्षाचालक आणि शासन यांच्यातील संवाद, विश्वास आणि विकास भागीदारी अधिक मजबूत करणारा महत्त्वाचा टप्पा ठरला.
मोदी सरकारच्या कामकाजाच्या शैलीचा उल्लेख करत ते म्हणाले की,जसे तुम्ही वाहतूक क्षेत्राला गती दिली, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाला नवी गती दिली आहे. सेवा, चांगले शासन आणि गरीब कल्याण हीच आमची हमी आहे.