Join us

पितृपक्ष सुरू होताच भाजीपाला महागला; शेवगा सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 07:42 IST

शेवगा शेंग २४० रुपयांवर : ढेमसे पोहोचले १२० रुपयांवर

नामदेव मोरेनवी मुंबई : पितृपक्ष सुरू होताच भाजीपाल्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. शेवगा शेंगाचे दर एका आठवड्यात दुप्पट झाले आहेत. होलसेल मार्केटमध्ये शेवगा १०० ते १५० रुपयांवर किरकोळ मार्केटमध्ये २४० रुपये किलोवर पोहोचला आहे. ढेमसे, वाटाण्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी ७४५ वाहनांमधून तब्बल ३,६३५ टन भाजीपाल्याची आवक झाली असून, त्यामध्ये ५ लाख ७० हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. गणेशोत्सवामध्ये भाजीपाला स्वस्त झाला होता. पितृपक्ष सुरू होताच भाव पुन्हा वाढू लागले आहेत. एक आठवड्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये शेवगा शेंग ४० ते ७० रुपये किलो दराने विकली जात होती. सोमवारी हे दर १०० ते १५० रुपये झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये शेवगा २०० ते २४० रुपये किलो दराने विकले जात आहे. शेवगा सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. फरसबी, वाटाणा, गवार, टोमॅटो, यांचे दरही वाढले आहेत. 

पालेभाज्यांचे  दरही वाढले  पालेभाज्यांचे दरही दोन दिवसांपासून वाढले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये कोथिंबिर  जुडी  ३० ते ४० रुपये, मेथी ३० ते ३५ रुपयांवर गेली आहे. पुढील एक महिना भाज्यांचे दर तेजीत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.