पिस्तूलधारी प्रवाशाने रोखली एसटी
By Admin | Updated: November 27, 2015 02:55 IST2015-11-27T02:55:37+5:302015-11-27T02:55:37+5:30
हातात पिस्तूल आणि सोबत चार ते पाच सहकाऱ्यांना घेऊन एका तरुणाने एसटी बस काही मिनिटे रोखून धरल्याची धक्कादायक घटना भिवंडीतील मानकोलीजवळ घडली.

पिस्तूलधारी प्रवाशाने रोखली एसटी
मुंबई : हातात पिस्तूल आणि सोबत चार ते पाच सहकाऱ्यांना घेऊन एका तरुणाने एसटी बस काही मिनिटे रोखून धरल्याची धक्कादायक घटना भिवंडीतील मानकोलीजवळ घडली.
२५ नोव्हेंबर रोजी त्र्यंबकेश्वरहून मुंबई सेंट्रलसाठी दुपारी २.३0 वाजता निघालेली एसटी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कल्याण फाट्याजवळ पोहोचली. एसटीतून प्रवास करणाऱ्या तरुणाशी वाहकाचा सुट्या पैशांवरून वाद झाला. या दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली.
कल्याण फाट्यावर प्रवासी उतरला. ही बस भिवंडी मानकोलीपर्यंत जाताच कल्याण फाट्यापासून ५ किलोमीटरपर्यंतचा प्रवास करत हा तरुण आपल्या चार ते पाच सहकाऱ्यांसोबत आला आणि त्याने बस अडविली व वाहकाला बाहेर येण्यास सांगितले.
वाहकाने प्रतिसाद न दिल्याने तरुणाने पिस्तूल काढली आणि एसटी वाहकाला बाहेर येण्यास सांगू लागला. या प्रकाराने घाबरलेल्या वाहकाने मात्र दरवाजाच लॉक करून घेतला. एसटी चालकाने मात्र प्रसंगावधान राखून बस सुसाट पळविली आणि अनुचित प्रकार टळला. (प्रतिनिधी)