युवकांनी पाडले पाइपलाइनचे काम बंद
By Admin | Updated: April 19, 2015 23:57 IST2015-04-19T23:57:39+5:302015-04-19T23:57:39+5:30
तारापूर एमआयडीसीच्या सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या जुनाट पाईपलाईनमधून आधीच क्षमतेपेक्षा दुपटीने प्रदूषित पाणी समुद्रात सोडले जात असताना

युवकांनी पाडले पाइपलाइनचे काम बंद
हितेन नाईक, पालघर
तारापूर एमआयडीसीच्या सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या जुनाट पाईपलाईनमधून आधीच क्षमतेपेक्षा दुपटीने प्रदूषित पाणी समुद्रात सोडले जात असताना आता पाईपलाईनने थेट समुद्रात ७.१ कि.मी.वर रासायनिक प्रदूषित पाणी सोडण्याचे कारस्थान शिजत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून किनाऱ्यावरील मासेमारी व्यवसायावरही परिणाम पडणार आहे. त्यामुळे येथील तरुणांनी एकत्र येऊन काम बंद पाडले. त्यामुळे ग्रामपंचायतीला बॅकफूटवर जावे लागले आहे.
तारापूरमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाल्यानंतर रासायनिक कारखान्यांचे प्रदूषित पाणी समुद्रात सोडता यावे यासाठी सन १९८३ पासून नवापूर गावातून पाईपलाईन टाकण्यात आली होती. कालांतराने ती ठिकठिकाणी फुटल्याने नवापूरसह पाम, टेंभी, कुंभवली आदी गावातील शेतजमीनीत प्रदूषित पाणी शिरून जमीनी नापिक बनल्या. तर किनाऱ्यावरील मासे मरण्याच्या घटनाही नित्याचाच झाल्या.
सध्या कारखान्यांची वाढती संख्या पाहून पूर्वीच्या २५ एमएलडीच्या सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता वाढवून ती ५० एमएलडी करण्यात येऊन नवीन पाईपलाईन टाकण्याच्या ११३ कोटी रुपयांच्या प्रस्तावाचे काम सुरू करण्यात आले होते. नवापूर गावातून ही पाईपलाईन जाणार असल्याने गावाला विकासनिधी म्हणून प्रत्येक वर्षी ४० लाखांचा निधी मिळणार असल्याचे सांगून सरपंच अंजली बारीसह त्यांच्या सहकाऱ्यांनी तिला ना हरकत दाखला दिला आहे. ही पाईपलाइन थेट समुद्रात ७.१ कि.मी. आत जाणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. त्यानंतर नवापूर, उच्छेली, दांडी, आलेवाडी, मुरबे, सातपाटी आदी गावासह दातिवरे ते झाई-बोर्डीपर्यंतचा समुद्र प्रदूषित होऊन मस्त्य संवर्धनावर मोठा दुष्परिणाम होणार असल्याचे नागरिकांना समजल्यानंतर नवापूरमधील पंकज धनू, भूषण बारी, अधिराज किणी, कश्यप बारी, नरहरी बारी, अनिल पागधरे आदींनी गावातील तरुण तसेच महिलांना एकत्र करून शुक्रवारी पार पडलेल्या ग्रामसभेत आक्षेप घेतला.