Join us

‘पिंक कोड’ घेणार चोरी गेलेल्या नवजात बाळाचा शोध; रुग्णालयासाठी मार्गदर्शक तत्त्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 09:27 IST

रुग्णालयातील प्रसूतीपूर्व तपासणी कक्ष, प्रसूती कक्ष, शस्त्रक्रियागृह, प्रसूती पश्चात कक्ष, शिशु अतिदक्षता कक्ष, डिस्चार्ज प्रक्रिया आदी सर्व टप्प्यांमध्ये नमूद केलेल्या सूचनांचे पालन करण्यात येणार आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्नित रुग्णालयांत नवजात बालकांचे अपहरण/चोरीचे प्रकार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यात ‘कोड पिंक’चा नियमाचा समावेश आहे. त्यामुळे चोरी झालेल्या बाळाचा ‘कोड पिंक’ शोध घेणार आहे. या मार्गदर्शकतत्त्वांची अंमलबजावणी करण्यात येणार आहेत. 

रुग्णालयातील प्रसूतीपूर्व तपासणी कक्ष, प्रसूती कक्ष, शस्त्रक्रियागृह, प्रसूती पश्चात कक्ष, शिशु अतिदक्षता कक्ष, डिस्चार्ज प्रक्रिया आदी सर्व टप्प्यांमध्ये नमूद केलेल्या सूचनांचे पालन करण्यात येणार आहे.  अधिष्ठाता किंवा वैद्यकीय अधीक्षकांनी संस्थेच्या सुरक्षेचा दर महिन्याला आढावा घ्यावा व त्रैमासिक आढावा अहवाल संचालनालयास सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले.

काय आहे कोड पिंक?सर्वप्रथम बाळ खरोखरच रुग्णालयातून हरवले किंवा चोरीला गेले आहे का, याची खात्री कर्तव्यावरील नर्सेस करतील. नंतर अधिपरिचारिकांनी प्रथम त्याबाबतची माहिती रुग्ण कक्षातील डॉक्टर्स आणि वैद्यकीय अधीक्षकांना देतील. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक यावर ‘कोड पिंक’ जाहीर करतील.

रुग्णालयाच्या दूरध्वनी चालकांना याबाबतची माहिती कळवून त्यांच्यामार्फत ‘कोड पिंक’बाबतची माहिती सर्व डॉक्टर्स, सुरक्षारक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, विभागप्रमुख यांना त्वरित कळवतील. 

त्यानंतर रुग्णालयाच्या दूरध्वनी चालकांना कळवून ‘कोड पिंक’  असा तीन वेळा उच्चारून संदेश देतील. तैनात सुरक्षारक्षक सर्व सहकाऱ्यांना, वरिष्ठांना ‘कोड पिंक’ म्हणून कळवतील आणि रुग्णालयातील सर्व प्रवेशद्वारे बंद करावेत.

रुग्णालय आवारात संशयास्पद व्यक्ती आढळल्यास ताब्यात घ्यावे. आवारातील सर्व बॅगांची, आवारातील गाड्यांची तपासणी करावी. वैद्यकीय अधीक्षकांनी नजीकच्या पोलिस स्टेशनला माहिती द्यावी. कोड पिंक  जाहीर झाल्यानंतर पुढील २ तासांसाठी कोड पिंक चालू ठेवावा.बाळ सापडल्यास सुरक्षा रक्षकांनी ’कोड पिंक ऑल क्लीयर’ असे तीनदा बोलून ‘कोड पिंक’ खंडित करावा.