बंगल्याची बनावट कागदपत्रे बनवून वैमानिकाची ३६ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:06 IST2021-03-16T04:06:12+5:302021-03-16T04:06:12+5:30
डी. एन. नगर पोलिसांकडून भामट्याला अटक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बंगल्याची बनावट कागदपत्रे तयार करून वैमानिकाची ३६ ...

बंगल्याची बनावट कागदपत्रे बनवून वैमानिकाची ३६ लाखांची फसवणूक
डी. एन. नगर पोलिसांकडून भामट्याला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बंगल्याची बनावट कागदपत्रे तयार करून वैमानिकाची ३६ लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी एका भामट्याला रविवारी डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली. हा आरोपी तक्रारदाराचा बालपणीचा मित्र असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
वैमानिकाचे नाव सत्येंद्र देवडा असे असून ते चार बंगला येथील तेरेसा अपार्टमेंटमध्ये राहतात. आरोपी राजन खांडेकर हा इस्टेट एजंट असून तोदेखील तिथल्याच एका इमारतीमध्ये राहत होता आणि देवडा यांचा बालपणीचा मित्र हाेता. २०१४ मध्ये तो मायकल मंटेरीयो नामक व्यक्तीच्या अंबोली येथील बंगल्यात राहण्यास गेला. देवडा हे प्रॉपर्टीच्या शोधात होते. तेव्हा खांडेकरने त्यांच्याशी संपर्क साधून मंटेरीयोला त्याचा बंगला ३६ लाखांना विकायचा आहे, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून देवडा यांनी बंगला विकत घेण्याची तयारी दर्शविली.
खांडेकरने मंटेरीयोची बहीण लुसी सोर्स (५५) आणि देवडा यांची भेट घडवून आणली. देवडा यांनी १ लाख १ हजार रुपये टोकन दिले. त्यानंतर उर्वरित रक्कमही दिली. मात्र व्यवहार आणि कागदपत्रांचे काम झाल्यानंतरही देवडा यांच्या नावावर वीजबिल आले नाही. त्यामुळे त्यांनी खांडेकरला खडसावले. ज्यात त्याने फसवणूक केल्याचे उघड झाले. या प्रकरणी त्यांनी डी. एन. नगर पोलिसांना तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी केली असता बंगल्याची कागदपत्रे बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार खांडेकरला अटक करण्यात आली. त्याने हीच कार्यपद्धती वापरून अनेकांची फसवणूक केल्याचे पोलिसांचे म्हणणे असून, त्यानुसार पुढील तपास सुरू आहे.
...........................................