Join us
Daily Top 2Weekly Top 5

जलमार्गे हज यात्रेचा मुहूर्त चुकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 06:38 IST

मोठा गाजावाजा करत, जलमार्गे हज यात्रेकरूंना सौदी अरेबियाला पाठविण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी यंदादेखील हा मुहूर्त चुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- खलील गिरकरमुंबई : मोठा गाजावाजा करत, जलमार्गे हज यात्रेकरूंना सौदी अरेबियाला पाठविण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी यंदादेखील हा मुहूर्त चुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत, केंद्रीय हज समितीद्वारे दोन वेळा आंतरराष्ट्रीय निविदा काढूनही त्यांना प्रतिसाद मिळालेला नसून, एकही इच्छुक कंपनी पुढे आलेली नाही. त्यामुळे २०१९ मध्ये होणाऱ्या हज यात्रेसाठी विमानाद्वारेच भाविक जातील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.केंद्रीय अल्पसंख्याक कल्याणमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी गतवर्षी घोषणा करून जलमार्गे हज यात्रेकरूंना हजला पाठविण्याचा मानस व्यक्त केला होता. त्याबाबत हज समितीने पुढाकार घेत, जलमार्गे भाविकांना हजला पाठविण्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यासाठी दोन वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागविण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जाहिरात देऊन या निविदांची माहिती देण्यात आली होती. मात्र, अद्याप एकाही कंपनीने याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.केंद्रीय हज समितीद्वारे याबाबत आम्ही दोन वेळा निविदा काढल्या आहेत. मात्र, अद्याप एकही कंपनी पुढे आलेली नाही. याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मात्र, २०१९ च्या हज यात्रेकरूंना जहाजामार्गे हजला पाठविणे कठीण आहे.- डॉ. मक्सूद अहमद खान,मुख्य कार्यकारी अधिकारी, केंद्रीय हज समिती

टॅग्स :हज यात्रा