Join us
Daily Top 2Weekly Top 5

ढिगारा उपसणे सुरूच; पश्चिम रेल्वेचा वेग ४८ तासांनंतरही मंदावलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:26 IST

अंधेरी पूल दुर्घटनेच्या ४८ तासांनंतरही पुलाचा कोसळलेल्या ढिगारा दूर करण्याचे काम रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सुरूच आहे. ओव्हरहेड वायरला आधार देण्यासाठी लोखंडी खांबांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे.

मुंबई : अंधेरी पूल दुर्घटनेच्या ४८ तासांनंतरही पुलाचा कोसळलेल्या ढिगारा दूर करण्याचे काम रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सुरूच आहे. ओव्हरहेड वायरला आधार देण्यासाठी लोखंडी खांबांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेवरील लोकल फे-यांचा वेग ४८ तासांनंतरदेखील मंदावलेलाच असल्याचे गुरुवारी दिसून आले.अंधेरी स्थानकावरील फलाट क्रमांक ८वर मंगळवारी सकाळी गोखले पुलाचा काही भाग कोसळला होता. रेल्वे प्रशासनाने दुर्घटनेनंतर मुख्य मार्गावरील काम त्वरित सुरू करून प्रवाशांना होणारा त्रास कमी केला. तथापि, लांब पल्ल्याच्या मार्गावरील रेल्वे रुळाचे काम गुरुवारीही सुरू होते. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.तसेच ओव्हरहेड वायरचे लोखंडी खांब कोसळलेल्या ढिगाºयाच्या भारामुळे एका बाजूस झुकले होते. या लोखंडी खांबांना आधार देण्याचे कामही सुरू आहे. दरम्यान, रेल्वे रुळांच्या बाजूला आणि दोनरेल्वे रुळांमध्ये असलेल्या डीपी बॉक्सची दुरुस्तीही हाती घेण्यात आली आहे.अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील गोखले पूल हा खूप जुना असून लोखंडी खांब गंजलेल्या स्थितीत आहेत. तसेच पुलाच्या खालील भागातील सिमेंट पडून आतल्या लोखंडी सळ्या बाहेर डोकावत आहेत. पुलाच्या खांबालाही तडे गेले आहेत. त्यामुळे गोखले पुलाची त्वरित दुरुस्ती झाली नाही, तर दुसरा अपघात होण्याची शक्यता आहे, अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.प्रवाशांमध्ये नाराजीओव्हरहेड वायरच्या झालेल्या नुकसानामुळे गुरुवारीही पश्चिम रेल्वेचा वेग मंदावला होता. पश्चिम रेल्वेवरील अंधेरी-विलेपार्ले या भागात अद्याप दुरुस्तीचे काम सुरू असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने या भागातून जाताना लोकल धिम्या गतीने चालविण्यात येत आहेत. यामुळे अंधेरी पूल दुर्घटनेच्या ४८ तासांनंतरही रेल्वे उशिराने धावत असल्याने पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना कामावर लेटमार्क लागत असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे.

टॅग्स :मुंबईअंधेरी पूल दुर्घटना