With photo : अपर कामगार आयुक्तपदी शिरीन लोखंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:34 IST2021-02-05T04:34:21+5:302021-02-05T04:34:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र शासन कामगार आयुक्तालय येथील कोकण विभाग मुंबई येथे शिरीन संजू लोखंडे यांची अपर ...

With photo : अपर कामगार आयुक्तपदी शिरीन लोखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र शासन कामगार आयुक्तालय येथील कोकण विभाग मुंबई येथे शिरीन संजू लोखंडे यांची अपर कामगार आयुक्त म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. गेल्या २९ वर्षांपासून कामगार विभागात येथे कार्यरत असलेल्या शिरीन लोखंडे यांनी मुंबई शहर येथे कामगार उपआयुक्त म्हणून कार्यभार पाहिला आहे. पालघर कार्यालयाची स्थापना झाल्यावर पहिल्या कामगार उपआयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
लोखंड व पोलाद माथाडी बोर्ड, कळंबोली येथे त्या अध्यक्षपददेखील सांभाळत आहेत. अनेक बाल कामगारांची सुटका करण्यात मोठे काम करत आहेत. ट्रेड युनियन आणि नियोक्ता संघटना यांचे कामगार कायद्याची जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक वर्क शॉपदेखील घेतले आहे. म्हाडाच्या समिती सदस्य म्हणून ११ हजार गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. जिल्हा कायदेशीर साहाय्य संस्थेमार्फत ५००पेक्षा जास्त पॅरा लीगल स्वयंसेवकांना कामगार कायद्याविषयी प्रशिक्षण दिले आहे. बांधकाम कामगारांची नोंदणी, लाभ वाटप याबाबत शिबिर आयोजित करत पाच हजारांहून अधिक बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचे लाभ मिळवून दिले आहेत. कोरोना काळात त्यांनी मोठे काम केले आहे. कामगारांना लॉकडाऊन काळातील वेतनाबाबत समझोता करून घेतला आहे. कामगार आयुक्तालय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्याबाबत विशेष भूमिका बजावली आहे आणि महिला सबलीकरणासाठी काम केले आहे.
दरम्यान, शिरीन लोखंडे यांचे वडील गुलाबराव गांगुर्डे हे नागपूर येथून अतिरिक्त कामगार आयुक्त म्हणून २००२ साली निवृत्त झाले होते. वडिलांनंतर मुलगीदेखील कामगार विभागात अतिरिक्त कामगार आयुक्त म्हणून काम पाहत आहे. त्यामुळे वडील आणि मुलीच्या या कामाची एका अर्थाने ऐतिहासिक नोंद झाली असून, पदोन्नतीनंतर शिरीन लोखंडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत त्याचे अभिनंदन आणि स्वागतदेखील केले जात आहे.