Join us

पीएच.डी., एम.फिल (पेट) प्रवेश परीक्षांचे अर्ज यंदा ऑनलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 05:12 IST

विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच स्वतंत्र अर्ज करता येणार

मुंबई : मुंबई विद्यापीठ पीएच.डी. आणि एम.फील प्रवेश परीक्षा (पेट) ऑनलाइन घेत असून या वर्षी प्रथमच दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे अर्ज करता येणार आहे. पीएच.डी.साठी ७८ विषय तर एम.फीलच्या २५ विषयांसाठी ही प्रवेश परीक्षा होईल. परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. परीक्षांचे आॅनलाइन अर्ज गुरुवारपासून सुरू झाले असून, ते विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २०१६च्या निर्देशानुसार, मुंबई विद्यापीठाने पीएच.डी., एम.फील प्रवेशाच्या संदर्भात कुलगुरूंचे निर्देश प्रसिद्ध केले होते. या आधारावर विद्यापीठाने डिसेंबर २०१८ मध्ये पीएच.डी., एम.फील प्रवेशासाठी प्रथमच आॅनलाइन प्रवेश परीक्षा घेतली. त्यानंतर या वर्षीच्या आॅनलाइन प्रवेश परीक्षेचे अर्ज २७ फेब्रुवारीपासून सुरू झाले असून, आॅनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १८ मार्च २०२० असेल.अर्ज आॅनलाइन उपलब्ध असून, शुल्कदेखील आॅनलाइन भरता येईल. विद्यार्थ्यांना त्याची कोणतीही प्रत विद्यापीठात जमा करण्याची आवश्यकता नाही. परंतु या अर्जाची प्रिंटआउट पुढील संदर्भासाठी काढून ठेवणे आवश्यक आहे. पेट परीक्षेचे अर्ज भरताना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांनी प्रवेश पात्रता पाहूनच प्रवेश अर्ज भरणे आवश्यक आहे. या परीक्षेस पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाचे विद्यार्थीही काही अटींच्या अधीन राहून अर्ज करण्यास पात्र राहतील.या परीक्षेचा निकाल परीक्षा झाल्यानंतर आॅनलाइन जाहीर करण्यात येईल. निकालानंतर या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळणार नाही किंवा याचे पुनर्मूल्यांकन होणार नाही. या पेट परीक्षेचे केंद्र मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातच असेल, असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.