Join us  

रमाबाई आंबेडकरनगर रहिवाशांच्या पुनर्वसनाचा पहिला टप्पा पूर्ण; बाधित झोपड्यांची यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 9:51 AM

१,६९४ रहिवाशांची पात्रता निश्चिती.

मुंबई :घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगरमधील पूर्वमुक्त मार्गाच्या विस्तारीकरण प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या एक हजार ६९४ झोपड्यांतील रहिवाशांची पात्रता प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, त्यांची प्रारूप यादी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) प्रसिद्ध केली आहे. त्याचबरोबर अन्य झोपड्यांच्या सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाले आहे. आता त्यांचीही प्रारूप यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 'एसआरए'कडून येत्या काही महिन्यांत ही प्रारूप यादी जाहीर केली जाईल.

रमाबाई आंबेडकरनगर येथील ३३.१५ हेक्टर जागेचा विकास करून तेथील अंदाजे १६ हजार ५७५ झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि 'एसआरए' यांच्या संयुक्त भागीदारीत हा पुनर्वसन प्रकल्प राबविला जाणार आहे. 'एसआरए'ने १५ मार्चपासून सुरू केलेले या भागातील झोपड्यांच्या सर्वेक्षणाचे काम आता पूर्ण झाले आहे.

पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पासाठी या झोपडपट्टीतील एक हजार ६९४ झोपड्या बाधित होणार आहेत. 'एसआरए'ने पहिल्या टप्प्यात पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या या एक हजार ६९४ झोपड्यांची प्रारूप यादी जाहीर केली आहे. आता यावर हरकती सादर करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.'एसआरए'कडून अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे, तर उर्वरित झोपड्यांची प्रारूप यादीही टप्प्याटप्प्याने जाहीर केली जाणार आहे.

अतिरिक्त पाच हजार घरे मिळणार-

१)  या सर्व रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी इमारतींचे बांधकाम 'एमएमआरडीए'कडून केले जाणार आहे.

२) पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पासाठी लागणारी जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणला विनामूल्यमिळणार आहे.

३) या योजनेमुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणला अतिरिक्त पाच हजार घरे उपलब्ध होणार आहेत.

टॅग्स :मुंबईघाटकोपरएमएमआरडीए