Join us  

अहो आश्चर्यम्! आज पेट्रोल, डिझेलचे दर घटले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 7:59 AM

पेट्रोल 21, तर डिझेल 11 पैशांनी स्वस्त

मुंबई: इंधनाचे वाढते दर देशवासीयांसाठी काही नवे नाहीत. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर ही आता नित्याचीच गोष्ट झाली आहे. मात्र आज पेट्रोल, डिझेलच्या दरात घट झाली आहे. मुंबईत पेट्रोल 21 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे आज मुंबईकरांनी पेट्रोलसाठी 88.08 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातदेखील आज घट झाली आहे. डिझेलच्या दरात 11 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर 79.24 रुपये इतका आहे. दिल्लीकरांनाही पेट्रोल, डिझेलनं दिलासा दिला आहे. दिल्लीतही पेट्रोल 21 पैशांनी, तर डिझेल 11 पैशांनी स्वस्त झालं आहे. आज दिल्लीत पेट्रोलसाठी 82.62 रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलचा दर 75.58 रुपये इतका आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोदी सरकारनं पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांची कपात केली होती. मात्र त्यानंतर पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढतेच राहिले आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर नव्वद रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. इंधनाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्यानं भाजीपाल्यासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे महागाईने अक्षरश: कंबरडे मोडले आहे. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढउतार होत आहेत. मात्र त्याचा परिणाम राज्यामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :पेट्रोलडिझेलपेट्रोल पंप