Join us  

दहा टक्के कमिशन पडले महागात आधी झाली मारहाण, नंतर अपहरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 9:27 AM

दिंडोशीत तिघांवर गुन्हा दाखल, पोलिसांचा तपास सुरु. 

मुंबई : दहा टक्के कमिशन मिळेल म्हणून एका पार्टीची मोठी रक्कम आरटीजीएस मार्फत पाठविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला मारहाण करत त्याचे अपहरण करण्याचा प्रकार मालाडमध्ये घडला. या दिंडोशी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.

तक्रारदार राकेश कोरी (वय ४२) हे इलेक्ट्रिशियन आहे. खासगी कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये मीडिएटर म्हणून काम करतात. यासाठी त्यांना कमिशन मिळते. काही महिन्यांपूर्वी मालाड पूर्वच्या स्टार्ट डेटा कंपनीमार्फत समीर नावाच्या व्यक्तीने फोन करीत पांडे हा व्यक्ती आरटीजीएस मार्फत मोठमोठी रक्कम अन्य बँक खात्यात पाठविण्याचे काम करतो. 

काही काम दिल्यास तक्रारदाराला १० टक्के कमिशन मिळेल असे म्हणाला. ३ जानेवारीला कोरीचा परिचित मुखर्जीने फोन करीत पुण्यातील पार्टीचे पैसे आरटीजीएसमार्फत पाठवायचे सांगितले. पांडेने पार्टीला मालाड पूर्वच्या डायमंड मार्केट परिसरात के गोस्वामी यांना ऑफिसमध्ये बोलावले. पांडेच्या सांगण्याप्रमाणे पटेल मॅडम पैसे आरटीजीएस करतील असे सांगितले होते. तक्रारदार, त्यांचा मित्र, लालचंद यादव, पटनाईक व त्याचा मित्र दुर्गेश देशमुख, पुण्याची पार्टी डायमंड मार्केटमध्ये ४वाजता पोहोचली. पटेलकडे पुण्याच्या पार्टीने ही रक्कम दिली. ते कार्यालयाबाहेर कन्फर्मेशनची वाट पाहू लागले. मात्र, पुण्याच्या पार्टीने इच्छित स्थळी पैसे पोहोचलेच नसल्याचे तक्रारदाराला सांगितले. 

अपहरणकर्त्यांशी  पोलिसांचा संवाद :

पटेल हीदेखील बाथरूमला जाऊन येते सांगून निघून गेली. तिचा मोबाईलही नंतर बंद झाला. पांडेच्या कर्मचाऱ्यांनीही हात वर केले. 

पैसे न मिळाल्याने पुण्याच्या पार्टीचे ख्वाजा सोहोबुद्दीन, अजीज खान, तसेच अश्रफ तांबे यांनी तक्रारदार, यादव, पटनाईक, तसेच देशमुखना मारहाण केली. ओला गाडी बुक करत त्यांना आत कोंबले. 

तक्रारदाराने १०० नंबरवर फोन केला. पोलिसांनी अपहरणकर्त्यांशी संवाद साधला. तेव्हा अपहृताना नागपाडा पोलिस ठाण्यात ते घेऊन आले. नागपाडा पोलिसांत जबाब नोंदवत अपहरण करणाऱ्यांविरोधात दिंडोशी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :दिंडोशीगुन्हेगारी