Permission given by the Standing Committee for the purchase of medicine, ICU, ventilator | औषध, आयसीयू, व्हेंटिलेटर खरेदीला स्थायी समितीने दिली परवानगी

औषध, आयसीयू, व्हेंटिलेटर खरेदीला स्थायी समितीने दिली परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मुंबईत अतिदक्षता विभागात सध्या ५१ तर १५ व्हेंटिलेटर खाटा उरल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी औषधे, आयसीयू खाटा तयार करणे, व्हेंटिलेटर अशा आवश्यक साधनांची खरेदी करावी, असे निर्देश स्थायी समितीने पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणाला दिले आहेत.
मुंबईत सद्य:स्थितीत ८३ हजार ९३४ सक्रिय रुग्ण असून १४०५ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र सध्या ८२४ ऑक्सिजन खाटा शिल्लक आहेत. तरी आवश्यक साधने तातडीने खरेदी करून उपलब्ध करावीत, असे निर्देश अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी दिले. 
रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक सुविधांची खरेदी करावी आणि या खर्चाला स्थायी समितीची कार्योत्तर मंजुरी घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले. मात्र अनावश्यक खरेदी करू नये, अशी 
सूचनाही प्रशासनाला करण्यात आली आहे.
रिकाम्या खाटा मिळतात कुठे?
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :पालिकेच्या वॉर रूममार्फत कोविड खाटांचे नियोजन करण्यात येते. सध्या ७५० ऑक्सिजन आणि ३२ व्हेंटिलेटर खाटा रिक्त असल्याचा दावा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केला आहे. यावर आक्षेप घेत रुग्ण प्रतीक्षेत असताना रिकाम्या खाटा आहेत तरी कुठे, असा संतप्त सवाल सर्वपक्षीय सदस्यांनी उपस्थित केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक आता ऑनलाइन घेण्यात येत आहे. या बैठकीत आयुक्तांनी निवेदन करीत उपलब्ध खाटांबाबत माहिती दिली. मात्र कोणत्या रुग्णालयात, कोविड केंद्रात या खाटा उपलब्ध आहेत, त्याची माहिती द्यावी, जेणेकरून आम्हाला फोन करीत असलेल्या नागरिकांना तिथे 
पाठवता येईल, असा टोला 
सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी लगावला.
मुलुंड जम्बो कोविड केंद्रात सामान्य खाटाही मिळत नसताना आयुक्त ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर खाटा असल्याचा दावा कोणत्या आधारावर करतात, असा सवाल भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला. यावर खाटांचे नियोजन योग्य पद्धतीने व्हावे तसेच नगरसेवकांनाही वेळोवेळी माहिती उपलब्ध करून दिली जावी, असे निर्देश अध्यक्षांनी दिले.


रिचर्डसन क्रुडासमध्ये खाटा वाढविणार
पालिकेच्या भायखळा येथील रिचर्डसन क्रुडास जम्बो कोविड सेंटरमध्ये दीड हजार खाटांची क्षमता आहे. सध्या या ठिकाणी केवळ तीनशे खाटा आहेत. त्यामुळे या ठिकाणी जादा खाटा तातडीने सुरू कराव्यात, असे निर्देश अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच भायखळ्यातील नेत्रचिकित्सा रुग्णालयातील ३० ऑक्सिजन खाटा तातडीने सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.

मुंबईबाहेरील रुग्णांसाठी खाटा राहतात राखीव
मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात मुंबईबाहेरील रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवण्यात येतात. त्यांना मुंबईच्या हद्दीवरील जम्बो कोविड 
केंद्रात दाखल करता येणार नाही का, असा सवाल अध्यक्षांनी उपस्थित केला.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Permission given by the Standing Committee for the purchase of medicine, ICU, ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.